भाजपला शिवसेनेने झीडकारले !

0

मुंबई । भाजपचा मित्रपक्षांना गोंजारण्याचा प्रयत्न त्यांच्यावरच बुमरँग झाल्याचे चित्र आहे. त्याला सकारात्मक प्रतिसादज मिळण्या ऐवजी शिवसेनेकडून झीडकारण्याचीच भूमिका घेतली गेली आहे. शिवसेनेबरोबर जायचे की नाही, हे भाजपने ठरविण्याची वेळ आता निघून गेल्याचे सांगत भाजपचे शक्तिप्रदर्शन हे ‘विचार हरवलेला मेळावा’ असल्याचा घणाघाती टोला शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावला. युती हवी की नको शिवसेनेला त्याची गरज आहे की नाही हे आम्ही ठरवू. आता भाजपने ते ठरविण्याची वेळ निघून गेल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केली. मुंबईतील भाजपच्या शक्तिप्रदर्शन मेळाव्यात शिवसेनेला चुचकारण्याचे सर्व प्रयत्न पक्षाध्यक्ष अमित शहा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत भाजपच्या सर्वच नेत्यांनी केले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही.

शिवसेना- भाजपा युतीविषयी नारायण राणे म्हणाले, ‘भाजपाच्या मंत्रिमंडळात मी गेलो तर शिवसेना सत्ता सोडणार होती. त्यांना इतकं असेल तर ते युतीत आले तर मी देखील युतीत राहणार नाही,’ शिवसेना माझा क्रमांक एकचा शत्रू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाने कोणाशी युती करावी हा त्यांचा प्रश्‍न आहे. पक्ष स्वबळावर येणार नाही हे जाणवल्यास युती केली जाते. पण राज्यात भाजपाने ठरवले तर त्यांची स्वबळावर सत्ता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या पावलावरच भाजपचे पाऊल
इतक्या प्राण्यांची नावे भाजपच्या नेत्यांनी महामेळाव्यात घेतली की त्यातून नेमका विचार काय द्यायचा होता तेच कळले नाही. कालपर्यंत काँग्रेसचे नेते अशा प्रकारे प्राण्यांची नावे घेऊन विरोधकांवर टीका करायचे. आता भाजपने काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवायचे काम चालवलेले दिसते. लोकशाहीत विरोधी पक्षाचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी टीकाही खासदार राऊत यांनी भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्याबाबत केली.