भाजपला सर्व पर्याय खुले : गडकरी

0

नवी दिल्ली। मुंबई महापौरपदासाठी एकत्र यायचे की नाही याचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे. शिवसेना सोबत आली नाही, तर भाजपला सर्व पर्याय खुले आहेत, असा सूचक इशारा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. महापालिका निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटला तरी शिवसेनेकडून योग्य प्रतिसाद मिळालेला नाही, ‘सामना’तील भाजपविरोधी भाषाही मवाळ झालेली नाही. त्यातच सेना काँग्रेससोबत जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. त्याच पार्श्वभूमीवर गडकरींनी ‘शिवसेना सोबत आली नाही, तर भाजपला सर्व पर्याय खुले आहेत’ असा सूचक इशारा शिवसेनेला दिला आहे. महापालिकेचे आयुक्त नेमण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत, त्यामुळे गडकरींच्या वक्तव्यात मोठा अर्थ दडलेला असल्याचे म्हटले जाते. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी प्रचारात दंग आहेत. बलिया इथल्या प्रचारसभेनंतर त्यांनी वृत्तवाहीनीवर बोलताना ही माहिती दिली आहे.

शिवसेनेला मुंबईत 84 जागा, तर भाजपला 82 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेनं 4 अपक्षांच्या पाठिंब्यासह एकूण 88 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी केली. येत्या 8 मार्चला मुंबईच्या नव्या महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांची जुळवाजुळव सुरु आहे.