भाजपला साथ देणार्‍यांना आता पश्‍चातापाची वेळ

0

शिरूर । जनतेला खोटी आश्‍वासने देऊन सत्तेत आलेले भाजप सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून ज्यांनी भाजपला मतदान केले आहे त्यांच्यावर आता पश्‍चाताप करण्याची वेळ आली असल्याचे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी सांगितले.शिरूर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने शिरूर बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून बाजार समिती ते तहसिलदार कार्यालय असा मोर्चा काढून हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते.

यावेळी पोपटराव गावडे, शशिकांत दसगुडे, राजेंद्र नरवडे, विश्‍वास ढमढेरे, बाळासाहेब नागवडे, सुभाष उमाप, मोनिका हरगुडे, विजेंद्र गद्रे, बंडु जाधव, सतीश कोळपे, सुभाष कळसकर, राजेंद्र जगदाळे, कुसुम मांढरे, सविता बगाटे, बाबासाहेब फराटे, नरेंद्र माने, गोविंद निंबाळकर,उत्तम सोनवणे, सविता पर्‍हाड, जाकिरखान पठाण, रंजन झांबरे, कलिम सय्यद, निलेश पवार, मोहित साकला, हफिज बागवान,अक्षय सोनवणे, डॉ.वर्षा शिवले,विद्या भुजबळ, पल्लवी शहा, संगिता शेवाळे, निलेश खाबिया, तुकाराम खोले, संतोष शितोळे, कुंडलिक शितोळे, प्रकाश दुर्गे, भरत काळे, नवनाथ गव्हाणे, पंडित दरेकर आदी उपस्थित होते.

चासकमान पाण्याचा प्रश्‍नही प्रलंबित
तालुक्यात चासकमान पाण्याचे विद्यमान आमदारांना नियोजन करता येत नसल्याची टीका करत डिसेंबर मध्येच पाणी सोडण्याचा अट्टहास कशासाठी असा सवाल अशोक पवार यांनी केला. सत्तेत असताना शिरूर तालुक्यात अनेक वीज उपकेंद्रे उभी करता आली. परंतु विद्यमान आमदारांना एकही उपकेंद्र सोडाच परंतु जळालेले ट्रान्सफॉर्मर वेळेत बसवता येत नाहीत. खड्यांच्या बाबतीत तालुक्यात इतके खड्डे आहेत कि याची एकत्रित बेरीज सरकारला पाठवू. नियोजनाचा अभाव व सरकारच्या फसव्या घोषणांमुळेच शेतकर्‍यांना आंदोलन करण्याची वेळ येत पवार यांनी स्पष्ट केले.

वेळोवेळी आंदोलने करणार
राष्ट्रवादीने तीन महिन्यांत सात वेळा आंदोलने केली असून शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी या पुढील काळातही सरकारला जाग आणण्यासाठी वेळोवेळी आंदोलने करणारच असे रवि काळे म्हणाले.

यापूर्वी महाराष्ट्रात असे राजकारण दिसले नाही
सरकारने अनेक निर्णय घेतले. परंतु ते निर्णय सर्वसामान्यांच्या मुळाशी आल्याने अनेक जण अडचणीत आले. जीएसटीचा घाई-घाई निर्णय घेतला परंतु निवडणुका आल्या म्हणून पुन्हा त्यात बदल करण्यात आला. शेतकर्‍यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. परंतु त्यातही भेदभाव केला गेला. असे राजकारण यापूर्वी महाराष्ट्रात कधीच दिसले नाही. खड्डेमुक्ती, शिक्षण, नोटबंदी, शेतमाल बाजारभाव आदी विषयांवर पवार यांनी तोफ डागत दोन वर्षांत अनेक जण रस्त्यावर येणार असून राज्य व केंद्र सरकारच्या कामकाजावर त्यांनी कडक हल्ला चढवला. राज्य व केंद्र सरकारवर घणाघाती टीका करताना पवार म्हणाले, सर्वसामान्य शेतकरी असो वा शहरी-ग्रामीण भागातील नागरिक यामध्ये फूट पाडण्याचे काम या सरकारकडून होत असून ‘अरे हे कसले राजकारण सुरू आहे,’ असा संतप्त सवाल पवार यांनी केला.