भाजपवरचा सामान्यांचा विश्वास उडाला; सत्तांतर अटळ!

0

दैनिक जनशक्तिला सदिच्छा भेटीत धनंजय मुंडे यांचा दावा

जळगाव । महाराष्ट्राच्या मातीवर हात ठेवून मातीत काय चाललय याची जाण असलेल्या नेत्यांपैकी नाथाभाऊ हे एक आहेत, परंतु अशा नेत्यांनाच भाजप दूर करत असून, सध्या भाजपमध्ये सामन्यांची जाण असलेल्यांचा अभाव आहे, असे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. दैनिक जनशक्तिच्या जळगाव आवृत्ती कार्यालयास मंगळवारी सकाळी ना. मुंडे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. भाजपवरचा जनतेचा विश्वास उडाला असून, यंदा सत्तांतर अटळ असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

हे विश्वास घातकी सरकार!
निवडणुकीच्या काळात अशक्य असे स्वप्न जनतेला दाखवून सत्ता मिळविली. प्रत्यक्षात काहीही दिले नाही. आगामी निवडणुकीतही असेच स्वप्न दाखवून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. मात्र जनतेच्या लक्षात हे आले असून, आगामी निवडणुकीत विश्वास घातकी सरकारला जनता जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. राज्यात सत्तांतर होणारच यात काही दुमत नाही. परंतु केंद्रातही एनडीएला मोठा फटका बसणार असल्याचा दावा ना. मुंडे यांनी यावेळी केला.

महागाई वाढली
यूपीए सरकारच्या काळात महागाई वाढल्याचा गवगवा करुन सत्ता मिळविली; मात्र आतातरी कोठे महागाई कमी झाली आहे असा प्रश्न मुंडे यांनी केला. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शन दिल्याची मोठी जाहिरातबाजी करतात, मात्र दुसरीकडे गॅसच्या दरात मोठी वाढ केली. तसेच रॉकेलचा पुरवठाही बंद केला आहे. या सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पात जनतेला काही तरी मिळेल अशी आशा होती; मात्र आरोग्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबींवर ठोस तरतूद नसल्याने जनतेचा भ्रम निराश झाला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

भाजपकडे मुद्दे नाही
आगामी वर्षभरात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. पाच वर्षाच्या काळात जनतेच्या विकासासाठी काहीही या सरकारने केलेले नसल्याने जनता संतापलेली आहे. आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाजपकडे कोणतेही ठोस मुद्दे नाही. एकतर पाकिस्थानशी युद्ध किंवा धार्मिक विषयाला पुढे करुन ही सरकार आगामी निवडणुकीला सामोरे जाऊ शकते, त्याशिवाय त्यांच्याकडे इतर कोणतेही मुद्दे नाही, असेही यावेळी ना. मुंडे म्हणाले.

हल्लाबोल यात्रेला जोरदार प्रतिसाद
1994 मध्येदेखील सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. मात्र यंदा त्याहीपेक्षा जास्त प्रतिसाद यावर्षीच्या हल्लाबोल मोर्चाला मिळत आहे. हल्लाबोल मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालादेखील जनतेकडून प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आगामी निवडणुकीला जनतेसमोर ठोस असे मांडण्यासारखे या सरकारकडे काहीही नाही, त्यामुळे सत्तातंतर हे अटळ असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला.