भाजपवर टीका आणि भाजपची कोंडीही

0

महापालिकेत बहुमत मिळाले आणि 5 महिन्यांपूर्वी संपूर्ण पुण्यावर भाजपची एक हाती सत्ता आली. या पाच महिन्यात सत्ताधारी भाजपला टीकेला तोंड द्यावे लागले शिवाय अनेक बाबीत या पक्षाची कोंडी झाली. पक्षातील गटबाजी या दरम्यान उफाळून आली हा आणखी वेगळा भाग. अगदी ताजे उदाहरण गणेशोत्सवाचे देता येईल.

पुणे महापालिकेतर्फे उत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यात पक्षाचा प्रचार चालला अशी टीका काँग्रेस गोटातून करण्यात येत आहे. पुन्हा पालिकेच्या पैशाची उधळपट्टी चालू केल्याचा आरोपही वर्तमानपत्रातून भाजपवर केला जातोय. पक्षात गटबाजी इतकी आहे कि या सर्व आरोपांना उत्तर कोण देणार हा सवाल आहेच. स्वातंत्र्यसैनिक भाऊ रंगारी हेच पुण्याच्या गणेशोत्सवाचे जनक आहेत, त्यांचा मान राखला जावा आणि यंदाचे वर्ष हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष नाही, असा भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचा दावा आहे. याकरीता त्यांनी पुराव्याची कागदपत्रे सादर केली असून आंदोलन उभे केले आहे. सत्ताधारी पक्ष म्हणून आंदोलनाला उत्तर देण्याची वेळ भाजपवर आली आहे. मुख्यमंत्री पुण्यात येऊन गेले त्यांनी रंगारी यांचा उल्लेख भाषणात टाळला. मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून एकप्रकारे शतकोत्तर रौप्य महोत्सवाचा पालिकेचा दावा मान्य केला. त्यानंतरही वाद मिटलेला नाही. या वादाचे सावट उत्सवावर आहे आणि त्यामुळे उत्सवात गाजावाजा करून घेण्याची संधी भाजपला निर्भळपणे घेता येत नाही ही त्यांची कोंडी आहे. खरे तर गणेशोत्सवाला राजकीय स्वरूप देता येत नाही. सर्व पक्षाचे कार्यकर्ते यात गुंतलेले असतात. हे लक्षात घेऊन माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी वेगळा पुणे फेस्टिवल चालू केला. तसेच महापालिकेतर्फे साजर्‍या होणार्‍या उत्सवात लोकसहभाग अतिशय अत्यल्प असतो. त्यामुळे पालिकेचे व्यासपीठ वापरून पक्षाचा प्रचार करण्याचा खटाटोप फायद्याचा नाही, तरीही केला तर भाजपला फक्त टीकेचे धनी व्हावेच लागेल. सध्या बाजारपेठेत कानोसा घेतला तर फारशी उलाढाल होत नसल्याचे कानावर येते. अनेक रिक्षावालेही हाच अनुभव सांगतात. या मंदीला केंद्र सरकारची धोरणे कारणीभूत असल्याचे व्यापारी वर्ग, उद्योजक यामध्ये बोलले जाते. भाजपसाठी ही बाब चिंतेची म्हणावी लागेल. नोटा बंदीचे समर्थन करणारे खासदार काकडे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर कुठे आहेत? असे प्रश्न विरोधक त्यातूनच विचारू लागले आहेत. डिजीटल इंडिया, मेक इन इंडिया याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. स्थानिक पातळीवर बोलायचे झाले तर स्मार्ट पुणे, मेट्रो, विकास आराखडा यावर सवाल केले जात आहेत. भाजपच्या सुदैवाने विरोधक क्षीण झालेले आहेत. डाव्या पक्षांची फार मोठी ताकद पुण्यात नव्हती आणि नाही, प्रमुख काँग्रेस पक्ष अजूनही गोंधळलेला आहे. एकजूट होऊन सत्तेच्या आधारे पुण्यावरील पकड कायम ठेवण्याची संधी अजूनही भाजपला आहे. मोदी यांच्या नेतृत्वावर भरोसा असलेला युवा वर्ग अजून विचलित झालेला नाही हि भाजपसाठी जमेची बाजू आहे.

– राजेंद्र पंढरपुरे