नाभिक संघटनेच्या भूमिकेने भाजपवाल्यांची अभूतपूर्व गोची
मुंबई/यवतमाळ : दौंड मधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने नाभिक समाजात नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे भाजपवाल्यांची हजामत करणार नाही असा निर्णय नाभिक संघटनेने घेतला असून, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. आपली ही नाराजी व्यक्त करण्यासाठी राज्याच्या अनेक भागांमध्ये नाभिक समाज रस्त्यावर उतरला आहे.
काय आहे प्रकरण….
काही दिवसांपूर्वी दौंड येथील पाटस येथे साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा मुख्यमंत्र्याच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य करताना नाभिक समाजाचा दाखला दिला. ज्या प्रकारे एक न्हावी तीन-चार ग्राहक असताना प्रत्येकाची अर्धी अर्धी हजामत करतो तसेच काँग्रेसने ठेकेदाराला मलई देऊन कामे अर्धवट ठेवली आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्याच्या या विधानावरुन नाभिक संघटना नाराज झाल्या असून, यापुढे भाजपच्या मंत्री, आमदार, नेते व कार्यकर्त्यांच्या दाढी करणार नाही व केस कापणार नाही असा निर्णय त्यांनी घेतला आहे. नाभिक समाज हा प्रामाणिक असून, आपला उदरनिर्वाह करत आहे, असे नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय नक्षणे यांनी सांगितले.