पुणे । गुजरातमध्ये शिवसेना निवडणूक लढवत असून शिवसेनेला तिथे त्यांना अपयश येईल. शिवसेनेने भाजपशी वैर करू नये. ते त्यांना परवडणार नाही, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला दिला आहे. ते पुण्यामधील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. शिवसेनेला भाजपबरोबर वैर परवडणार नाही. त्यामुळे त्यांनी युती तोडण्याची भाषा करू नये, असे आठवले यांनी सांगितले. भाजप शिवशक्ती भीमशक्ती एकत्र राहिली पाहिजे. शिवसेनेने सत्तेत राहून विरोध करू नये. तसेच सतत सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी देऊ नये, असा सल्ला आठवले यांनी दिला.
गुजरातची निवडणूक लढविणार नाही
गुजरातमध्ये भाजपचेच सरकार येईल तसेच रिपाइं गुजरातमध्ये निवडणूक लढवणार नाही. रिपाइं भाजपला संपूर्ण पाठिंबा देणार असल्याची घोषणा देखील आठवले यांनी यावेळी केली. काँग्रेसने कितीही प्रयत्न केला तरी दलित समाज भाजपबरोबर आहे. काँग्रेसचा मतांचा टक्का वाढेल पण जागा मिळणार नाही. गुजरातमध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येईल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर आपण शरद पवारांची भेट घेऊन त्यांनी पूर्वी सरकार वाचवण्यासाठी भाजपला मदत करण्याचा शब्दाची आठवण करून देईल, असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी मदत नाही केल्यास अपक्ष व इतर आमदार भाजपला मदत करतील तर काही बहुमताच्या वेळी गैरहजर राहून भाजपला मदत करतील. त्यामुळे हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास देखील आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.