भाजपसाठी उत्तर प्रदेशात गाय मम्मी तर ईशान्य भारतात यम्मी

0

हैदराबाद । उत्तर प्रदेशात स्वबळावर सत्ता आल्यानंतर भाजपने मुख्यमंत्रीपदावर योगी आदित्यनाथ यांची निवड केली. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी एकामागोमाग एक असे अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. गोहत्या आणि गोमांस बंदीचाही निर्णय आदित्यनाथ यांनी घेतला. या निर्णयानंतर आता एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपनं बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. सत्तेवर आल्यावर भाजप सरकारकडून अवैध कत्तलखान्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील कत्तलखान्यांवर होत असलेल्या कारवाईचा मुद्दा ओवैसींनी संसदेतही मांडला होता. त्यानंतर आता भाजपसाठी उत्तर प्रदेशमध्ये गाय मम्मी(आई) असून ईशान्य भारतात त्यांच्यासाठी गाय यम्मी आहे असा टोलाही ओवैसी यांनी लगावला आहे.

मेघालय, मिझोरम, नागालँड या तीन राज्यांमध्ये येत्या काळात विधानसभा निवडणूक होणार आहेत. या भागात गोमांस खाणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये सत्तेवर आल्यास भाजपकडून बीफ बंदीचा निर्णय घेतला जाईल अशी चर्चा रंगली होती. पण भाजपने हे वृत्त फेटाळून लावले होते. भाजपच्या या दुटप्पी भूमिकेवर हल्ला चढवत असदुद्दीन ओवैसी यांनी भाजप मतांचा विचार करून भूमिका ठरवणारा पक्ष असल्याचा आरोप केला. उत्तर प्रदेशमध्ये भाजपसाठी गाय ही माता आहे. पण ईशान्य भारतात बीफ बंदीचा निर्णय ते घेत नाही असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.