भाजपसाठी ठरले ऐतिहासिक वर्ष; मेट्रो, पीएमआरडीएमुळे बदलणार शहरांचा चेहरा-मोहरा!

0

पुणे/पिंपरी-चिंचवड : मावळलेले 2017 हे वर्ष पुणे व पिंपरी-चिंचवड भाजपसाठी ऐतिहासिक ठरले आहे. प्रदीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात देत भाजपने या दोन्हीही महापालिकांत बहुमताने सत्ता प्राप्त केली. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे अवघे दोन नगरसेवक होते. फेब्रुवारीत पार पडलेल्या निवडणुकांत या दोनवरुन पक्षाने मुसंडी मारत आता 78 नगरसेवकांची मजल गाठली. राष्ट्रवादीतून आलेले पक्षाचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप व आ. महेश लांडगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत हा चमत्कार घडविला. अर्थात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सत्तेतून पुरविलेली ताकदही त्याला कारणीभूत होती. अशाच प्रकारे, पुणे भाजपनेही 152 नगरसेवकांच्या पुणे महापालिकेत तब्बल 98 जागा जिंकून निर्विवाद बहुमत प्राप्त केले. एवढेच नव्हे तर खासदार, आमदार ही लोकप्रतिनिधींची पदेही या शहरातून प्राप्त केली. पुणे व पिंपरी-चिंचवड ही राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तास्थाने होती. ती जिंकून भाजपने इतिहास घडविला. आता महामेट्रो, पीएमआरडीए, यासह स्मार्ट सिटी या उपक्रमातून शहराच्या विकासाला दिशा मिळाली असून, वेगाने विकासकामे होत असल्याने पुढील विधानसभा व लोकसभा निवडणुकांतही भाजपची घोडदौड कायम राहते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

पीसीएमसीत ‘स्थायी’चा कारभार पारदर्शी
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीपूर्वी शहरात भारतीय जनता पक्ष हा अशक्त पक्ष होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आ. लक्ष्मण जगताप यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर या पक्षाला ऊर्जितावस्था आली. त्यापूर्वी हा पक्ष गडकरी-मुंडे अशा गटात विभागला गेला होता. त्याचा अचूक फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घेत होते. आ. जगताप यांच्या पाठोपाठ भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांनीही भाजपात प्रवेश केला. त्यातच देशात जोरदार असलेली मोदी लाट यामुळे फेब्रुवारीत भाजपने महापालिका निवडणुकीत दोन वरून 78 जागांवर मुसंडी मारली व एकहाती महापालिकेची सत्ता हस्तगत केली. सत्तेवर आल्यानंतर सर्वात महत्वाचा बदल घडला तो म्हणजे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीच्या बैठकीची दारे खुली करण्यात आली. पूर्वी स्थायीच्या बैठका या ‘बंदद्वार’ होत होत्या, त्या स्थायीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी ‘उघडद्वार’ घेण्यास सुरुवात केली. म्हणजे, पत्रकारांनासुद्धा या बैठकीला बोलविण्यात येऊ लागल्याने गैरप्रकार बंद झाले. पूर्वी स्थायीच्या प्रत्येक निर्णयावर संशयाचे ढग दाटत असत व त्यातून घोटाळा किंवा गैरप्रकाराचा वास येत असे. आता मात्र हा प्रकार बंद झाला असून, कारभार पारदर्शी होऊ लागला आहे.

नवीन वर्षात धावणार पुणे मेट्रो
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अत्यंत महत्वांकांक्षी प्रकल्प असलेला पुणे मेट्रोचे कामही भाजपच्या सत्ताकाळातच सुरु झाले. विशेष बाब म्हणजे, हे काम अत्याधिक वेगाने होत आहे. डिसेंबर 2016 मध्ये सुरु करण्यात आलेल्या या प्रकल्पाने मावळलेले वर्ष 2017 मध्ये वेग घेतला आहे. हा वेग नागपूर मेट्रोच्या कामापेक्षाही जास्त आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकी संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये हे काम बहुतांशरित्या पूर्ण झालेले असेल. याच वर्षात पिंपरी ते दापोडी ही मार्गिका सुरुही झालेली असेल, असेही दीक्षित यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुणे मेट्रो ही पुणे व पिंपरी-चिंचवडसाठी ऐतिहासिक उपलब्धी ठरलेली आहे.

रिंगरोडने हिंजवडी होणार वाहतूक कोंडीमुक्त!
राज्य सरकारने स्थापन केलेले पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हीदेखील या वर्षात अत्यंत महत्वाची उपलब्धी म्हणावी लागेल. प्राधिकरण स्थापन करून दोन वर्षे झाली असली तरी प्राधिकरणाचे खर्‍याअर्थाने काम 2017मध्येच सुरु झाले. पीएमआरडीए हा दुसरा सर्वात मोठा प्रकल्प ठरलेला आहे. 23.30 किलोमीटर हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रोजेक्ट आणि महानगर प्राधिकरण क्षेत्रातील रिंग रोडची बांधणी ही दोन मोठी कामे याच वर्षात सुरु झाली आहेत. याच रिंगरोडमुळे आयटी पार्क असलेल्या हिंजवडीतील वाहतूक कोंडी सुटणार असून, पुणे शहराचा झपाट्याने विस्तार होणार आहे. सद्या आयटी पार्कमध्ये दोन लाख अभियंते, कर्मचारी काम करतात. बहुतांश कर्मचारी हे पुण्यातच राहतात. या कर्मचारीवर्गाची ने-आण करण्यासाठी 885 बसेस व एक लाख त्यांची खासगी वाहने या मार्गावरून सद्या जात असल्याने वाहतूक कोंडी हे मोठे संकट या रिंगरोडमुळे दूर होणार आहे.