भाजपही काँग्रेसच्या वाटेवर!

0

सत्ता लोकप्रतिनिधींना अनेक अधिकार देते; या अधिकारातून प्रचंड अशी ताकद त्यांच्याकडे येते. या ताकदीचा वापर करून निवडून देणार्‍या जनतेला त्यांनी संरक्षण द्यावे, मुलभूत गरजा पुरवाव्यात, अशी माफक अपेक्षा असते, किंवा ते त्यांचे कर्तव्यच असते. देशाचा इतिहास पाहिला तर काँग्रेसने सर्वाधिक काळ सत्ता उपभोगली. जनतेने वेळोवेळी काँग्रेसवर विश्वास टाकून ही संधी त्यांना दिली. स्वातंत्र्यापासून भारताच्या विकासासाठी काँग्रेसने जे काही केले ते कुठल्याही राजकीय पक्षाला अद्याप जमलेले नाही; हेदेखील सत्यच आहे. परंतु, याच काँग्रेसला नंतर सत्तेचा एवढा माज चढला की, लोकांची दु:खेसुद्धा त्यांना दिसत नव्हती. काही वाचाळवीर देशातील जनतेलाच वेड्यात काढू लागले होते. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला होता. अशाही परिस्थितीत पक्षाचे शीर्ष नेतृत्व भ्रष्टाचारी नेत्यांना क्लीनचिट देऊन पवित्र करून घेत होते. शेवटच्या टप्प्यात इतका अतिरेक झाला की, काँग्रेसला समूळ उखडून मतदारांनीच सत्तेपासून दूर सारले.

लोकशाहीत मतदार हाच राजा असतो आणि कुणाला राजसिंहासनावर बसवायचे, कुणाला खाली खेचायचे हे तोच ठरवतो. सत्ताधार्‍यांना आलेला सत्तेचा माज उतरविण्याचे रामबाण औषध प्रत्येक नागरिकाला मतदानाच्या हक्काद्वारे लोकशाही व्यवस्थेकडून मिळालेले आहे. या औषधाने भल्याभल्यांची झोप अनेकदा उडविली आहे. सत्ता म्हणजे परीस, म्हटले तर नशाही आहे. तिचा वापर कसा करायचा हे प्रत्येक सत्ताधार्‍यावर अवलंबून आहे. अच्छे दिन आयेंगे म्हणत मोदी सरकार सत्तेवर आले. बघता-बघता या सरकारने तीन वर्षांचा कालावधीही पूर्ण केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांच्या मनावर गारूड केले त्याचा अंमल अजूनही बर्‍याच अंशी शिल्लक आहे. पण, अलिकडे भाजपाध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ किंवा अन्य काही नेते यांची भाषा बदलली आहे. यामुळे भविष्यात भाजप अडचणीत येऊ शकतो. अगदी ताजे उदाहरण गोरखपूरच्या बाल मृत्युकांडाचे देता येईल. येथील बाबा राघव दास रूग्णालयात प्राणवायू वेळेत उपलब्ध न झाल्याने तब्बल 72 पेक्षा जास्त बालकांचा तडफडून मृत्यू झाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद घेतली जावी, अशी ही घटना. पण, सत्तेची भगवीपट्टी कपाळावरून सरकत-सरकत आता डोळ्यांवर आल्याने भाजपाध्यक्ष अमित शहांना ही घटना किरकोळ वाटली. देशात घडलेली बालमृत्यूची ही पहिलीच घटना नव्हे, असे अतिशय धक्कादायक विधान त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने हा माणूस किती असंवेदनशील आहे, हे देशाला कळून चुकले.

दुसरीकडे, ज्या राज्यात बालमृत्यूची ही भयंकर घटना घडली, त्या राज्याचे मुख्यमंत्रीही घटनेच्या दुसर्‍याच दिवशी राज्यातील नागरिकांना जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करा, असे आवाहन करत होते. आपल्या घरात 72 छोटी-छोटी निरागस बालके केवळ मानवी चुकांमुळे तडफडून मृत पावली असताना हा कुटुंबप्रमुख जन्माष्टमी धुमधडाक्यात साजरी करण्याचा विचारच कसा करू शकतो? हे माणुसकीचे दर्शन मुळीच नाही. योगींच्या या चुकीवर पांघरूण घालण्यासाठी आणि विरोधकांना उत्तर देण्याच्या नादात शहा यांनी केलेले विधानसुध्दा अक्षम्य असेच आहे. या दोन्ही नेत्यांना सत्तेचा कैफ तर चढला नाही ना? अशीच शंका येत आहे. अन्यथा अशाप्रकारचे वक्तव्य त्यांनी केले नसते. काँग्रेस नेते खा. राज बब्बर यांनी गोरखपूर दुर्घटनेनंतर भाजप सरकारवर टीका करताना, हे खुनी सरकार असल्याचे म्हटले होते. बब्बर हे विरोधक आहेत ते अशाप्रकारचे आरोप करणारच; पण, मुख्यमंत्री योगी आणि अमित शहा यांनी केलेली वक्तव्ये ही माफीच्या लायक नाहीत. ज्यांची मुले दगावली आहेत त्यांची काय अवस्था असेल, याचा तरी थोडा विचार या द्वयींनी करणे आवश्यक होते. विरोधकांना हवी ती टीका करू द्या, त्यांची तोंडे बंद करण्याच्या अनेक उपाययोजना भाजपला ठाऊक आहेतच. पण, कुठलेही वक्तव्य करताना जनतेच्याही मनाचा विचार त्यांनी करायला हवा होता. जनतेला गृहीत धरण्याची काँग्रेसने केलेली चूक भाजपने करायला नको आहे; परंतु ते ही चूक हेतुपुरस्सर करताना दिसत आहेत. योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांच्या पावलावर पाऊल ठेवत केंद्रातील वरिष्ठ मंत्री अरूण जेटली यांनीही असेच काहीसे विधान केले होते. जेटली यांचे विधान हे दिशाभूल करणारे आहे. सरकारने टेरर फंडिंगविरोधात धडक कारवाई सुरू केल्याने काश्मीरातील दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहे.

दहशतवादी जीव मुठीत घेऊन पळू लागले आहेत, असे हास्यास्पद वक्तव्य जेटली यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात केले. काश्मीर खोर्‍यात दररोज सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांच्या चकमकींच्या घटना घडत आहेत. ज्यादिवशी जेटलींनी हे विधान केले; त्याच दिवशी काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अकोल्यातील जवान सुमेध गवई यांच्यासह दोन जवान शहीद आणि चार जवान जखमी झाले होते. मग् सांगा जेटली दहशतवादी कुठे पळून जात आहेत? ते पळताना तुम्हा कोणत्या चष्म्यातून दिसत आहेत, तो चष्मा जरा आम्हालाही द्या. काश्मीर खोरे पेटलेले आहे, त्या आगीत जवान आणि पोलिसांच्या आहुती पडत आहेत. तरीही जेटली नक्की कुणाची दिशाभूल करत आहेत? भाजपचे मंत्री आणि नेते बेजबाबदारपणे वागू आणि बोलू लागल्याने भाजपही काँग्रेसच्याच वाटेवर आहे असेच वाटून राहिले आहे. उडदामाजी काळे-गोरे निवडताना जनतेने काही तरी चुकीचे केले असेच आम्हाला आता वाटू लागले आहे.