मुंबईतील भाजपाच्या कोअर कमिटीसमोर इच्छुकांची नावे सादर
जळगाव – देशभरात सात टप्प्यात होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी आचारसंहिता जाहीर झाली असून, जिल्हयातील रावेरसह जळगाव मतदारसंघात तिकीट कुणाला मिळणार? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. विद्यमान खासदारांचे तिकीट राखले जाते की अन्य उमेदवाराला संधी दिली जाते? याबाबत नानाविध चर्चा रंगत असताना मुंबईतील भाजपा कार्यालयात सोमवारी झालेल्या कोअर कमेटीच्या बैठकीत रावेरपेक्षा जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे दिसून आले. रावेरसाठी विद्यमान खासदार रक्षा खडसेंसह माजी नगरसेवक अजय भोळेंचे नाव समोर आले तर जळगाव लोकसभेसाठी मात्र विद्यमान खासदारांसह सात इच्छुकांची नावे पुढे आल्याने तिकीट कुणाला मिळणार? याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
मुंबईतील भाजपा कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, ना. सुभाष देशमुख, ना. सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, बालविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आशिष शेलार यांच्यासह कोअर कमिटीतील सदस्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी रावेर लोकसभेसाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्यासह भुसावळचे माजी नगरसेवक व ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अजय भोळे यांचे इच्छुक म्हणून नाव पुढे आले आहे तर जळगाव लोकसभेसाठी विद्यमान खासदार ए.टी.नाना पाटील, आमदार स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी मंत्री एम.के.अण्णा पाटील, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, डॉ. संजीव पाटील, डॉ. उद्धव माळी हे इच्छुक असल्याची माहिती कोअर कमेटीचे सदस्य आ. एकनाथराव खडसे यांनी दिली.
अंतिम निर्णय दिल्लीतूनच
भाजपाच्या विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याच्या वावड्या उठत असतानाच तिकीट वाटपाबाबत आलेली नावे वरिष्ठ स्तरावर पाठवल्यानंतर दिल्लीतील पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेणार असून आज केवळ प्राथमिक चर्चा झाली असल्याची माहिती आ. खडसे यांनी ‘जनशक्ति’शी बोलतांना दिली.