शिवसेना ३० रोजी भूमिका जाहीर करणार
जळगाव – जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात युतीधर्म पाळला जावा म्हणुन भाजपाकडुन शिवसेनेच्या मनधरणीचे प्रयत्न केले जात आहे. दरम्यान आज शहरातील एका हॉटेलात भाजपा आणि शिवसेनेचे मंत्री व प्रमुख पदाधिकार्यांची संयुक्त बैठक पार पडली.
सत्तेत भागीदारी असली तरी जळगाव जिल्ह्यात मात्र भाजप व शिवसेनेत कायम कट्टरता राहीली होती. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकार्यांसह कायकर्त्यांनी युती नकोच अशा भावना श्रेष्ठींजवळ व्यक्त केल्या होत्या. मात्र वरीष्ठ स्तरावरुन युतीचे आदेश आल्याने नाईलाजाने शिवसैनिक त्यास तयार झाले. अशातच धरणगाव, पाचोरा आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी बैठका घेऊन निवडणुकीत भाजपाला मदत न करण्याचे ठराव केले. या ठरावांमुळे भाजपाची चांगलीच कोंडी झाली. दरम्यान आज भाजपाने शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी पुढाकार घेत पहीली बैठक शहरातील एका हॉटेलमध्ये घेतली. या बैठकीत निवडणुकीच्या दृष्टीने एकत्र काम करण्याची गळ भाजपाने शिवसेनेला घातली. दोन्ही मतदारसंघात युतीकडून भाजपाचेच उमेदवार असल्याने ना. गिरिष महाजन यांनी शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच आरपीआयचे पदाधिकारी यांना प्रचारासाठी काम एकदिलाने करावे असे आवाहन केले. या बैठकीस भाजपाचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, शिवसेना उपनेते व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, माजी आ. चिमणराव पाटील, खा. रक्षा खडसे, आ.स्मिता वाघ, सेनेचे आ.चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर पाटील, भाजपाचे आ.हरिभाऊ जावळे, आ.उन्मेष पाटील, जळगाव जिल्हा युती समन्वयक आ. राजुमामा भोळे, आ.चंदुलाल पटेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, भाजपाचे संघटनमंत्री किशोर काळकर, आरपीआयचे रमेश मकासरे, आनंद खरात, आनंद बाविस्कर, भाजप जि.प. उपाध्यक्ष नंदु महाजन, शिसवनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितिन लढ्ढा, मनपा विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन, विष्णू भंगाळे, नितिन बरडे, भाजपाचे स्थायी सभापती जितेंद्र मराठे, विशाल त्रिपाठी,दिपक सुयवंशी, महेश जोशी हे उपस्थित होते.
शिवसेना ३० रोजी भूमिका जाहीर करणार- ना. गुलाबराव पाटील
शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर अन्याय झालेला आहे. अन्यायाला वाचा फोडण्याची हीच वेळ आहे. स्थानिक निवडणुका आल्या की युती होत नाही आणि राष्ट्रीय, राज्याच्या निवडणुकांमध्ये युती होते. यावरून कार्यकर्ते नाराज होतात. दि. ३० रोजी शिवसेनेचे संपर्कप्रमुख जळगाव दौर्यावर येणार आहेत. त्यावेळी शिवसेनेची बैठक होणार असुन या बैठकित शिवसेना जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत निर्णय घेणार असल्याचे शिवसेना उपनेते तथा सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये ताण-तणाव – ना. महाजन
जिल्ह्यात अनेक निवडणुका ह्या भाजपा आणि शिवसेनेने समोरासमोर लढल्या आहेत. कारण जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अस्तित्वच नाही. त्यावेळी अनेकदा राजकीय संघर्ष देखिल झाले आहे. त्यामुळे निश्चीतच युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये ताण-तणाव असल्याची कबुली भाजपाचे मंत्री ना. गिरीश महाजन यांनी दिली. हा ताण-तणाव कमी करण्यासाठीच शिवसेनेच्या पदाधिकार्यांशी चर्चा सुरू असुन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ना. गिरीश महाजन यांनी सांगितले.
भाजपाचे उमेदवार उद्या अर्ज भरणार
भारतीय जनता पार्टीचे जळगाव लोकसभेच्या उमेदवार आ. स्मिता वाघ व रावेर लोकसभेच्या उमेदवार खा. रक्षा खडसे ह्या उद्या दि. २८ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे ना. गिरीश महाजन यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील दोन्ही जागा ह्या लाखोंच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.