कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली असून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला आहे तर भाजपा उमेदवार सत्यजीत कदम यांचा दारुण पराभव झाला आहे. दरम्यान, कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी मिळवला असून कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचे स्वप्न अपूर्ण ठरले आहे.
पहिल्या आमदार निवडून येण्याचा मान
उत्तर कोल्हापूर मतदारसंघानं आतापर्यंत 9 आमदार पाहिले. पैकी दोन जण प्रत्येकी दोनदा निवडून आले. मात्र कोल्हापूर उत्तरमधून एकदाही महिला उमेदवार विजयी झालेली नाही. त्यामुळे जयश्री जाधव यांचा विजय ऐतिहासिक ठरला असून विधानसभेत पहिल्यांदाच उत्तर कोल्हापूरचं प्रतिनिधीत्व महिला करताना दिसेल.
आतापर्यंत हे उमेदवार विजयी
1972 : त्र्यं. सी. कारखानीस (शेकाप)
1978 : रवींद्र सबनीस (जनता पक्ष)
1980 : लालासाहेब यादव (काँग्रेस)
1985 : प्रा. एन. डी. पाटील (शेकाप)
1990 : दिलीप देसाई (शिवसेना)
1995 : सुरेश साळोखे (शिवसेना)
1999 : सुरेश साळोखे (शिवसेना)
2004 : मालोजीराजे छत्रपती (काँग्रेस)
2009 : राजेश क्षीरसागर (शिवसेना)
2014 : राजेश क्षीरसागर (शिवसेना)
2019 : चंद्रकांत जाधव (काँग्रेस)
पहिल्या फेरीपासून आघाडी
एकूण 26 फेर्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेर्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. अखेर त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला.
रीक्त जागेसाठी झाली पोटनिवडणूक
काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रीक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली तर भाजपकडून सत्यजीत कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. त्यामुळे निकालाची उत्सुकता होती.
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
यानिवडणुकीत काँग्रेससह भाजपच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपली ताकद पणाला लावली तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अनेक दिवसांपासून कोल्हापूरात ठाण मांडलं होतं. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही इथे प्रचार केला होता. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या प्रचारामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली.