भाजपाचा ‘राज’मार्ग!

0

डॉ. युवराज परदेशी

ठाकरे कुटूंबात जेंव्हा जेंव्हा उध्दव की राज? अशी तुलना झाली तेंव्हा – तेंव्हा राज ठाकरे यांचे पारडे जडच राहिल्याचे शिवसेनेचा इतीहास सांगतो. राज ठाकरे यांच्याकडे दुरदृष्टी आहे, याची दोन बोलकी उदाहरणे पुरेशी आहे. जेंव्हा राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदींचा उदय देखील झालेला नव्हता तेंव्हापासून राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींचे कौतूक करायला सुरुवात केली होती. तेंव्हा ते मोदींच्या गुजरात मॉडेलच्या प्रेमात पडले होते. त्यांनतर मोदींचा प्रवास सर्वांच्या समोर आहे. दुसरे उदाहरण म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकांदरम्यान स्वत:च्या पक्षाचा एकही उमेदवार उभा नसतांना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. यावेळी मात्र उध्दव ठाकरे शरद पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. मुळात लोकसभेवेळीही पवारांचे लक्ष विधानसभा निवडणुकांवरच होते. त्याचे फलित त्यांना मिळाले. हे राज ठाकरेंनी आधीच हेरले होते. त्यांच्या धरसोडी भुमिकेमुळे मनसेच्या हाती काहीच आले नाही, हे देखील तितकेच खरे आहे, मात्र या चुका सुधारण्यासाठी त्यांनी नवी वाटचाल सुरु केली आहे, ती कितपत यशस्वी ठरते हे लवकरच स्पष्ट होईलच!

राज्यातील राजकारणात गेल्या काही महिन्यात अनेक उलथापालथ पाहायला मिळाली. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेने भाजपाची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी सरकार स्थापन केले त्यामुळे भाजपाला सर्वाधिक जागा मिळूनही राज्यात विरोधी बाकांवर बसावे लागले. राज्यातील राजकारणात ‘एकला चलो रे’ आणि धरसोडची भूमिका सध्या काहीही कामाची नसून, युती व आघाड्यांचा प्रयोग केल्याशिवाय सत्तेची फळे चाखता येत नाही, याचे महत्त्व मनसे प्रमुख राज ठाकरे यांना बहुतेक पटलेले दिसते. राज्यात महाविकास आघाडीचे नवीन समीकरण निर्माण झालेले असतानाच आता भाजप आणि मनसेची जवळीक वाढू लागल्याने आणखी एक राजकीय समीकरण निर्माण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील गुप्त भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 2019च्या लोकसभा निवडणूक प्रचारात तिखट शब्दांमध्ये उदाहरणांचे दाखले देत टीका करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे हे राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीत आता भाजपच्या सोबत घरोबा करणार असल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपा एकटी पडली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या अनेक जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला. जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने साथ सोडल्याने राज्यात भाजपची पिछेहाट सुरू झाल्याने भाजपला सर्वांना अपिल असलेल्या मित्रपक्षाची गरज असल्याने नव्या मित्रपक्षाच्या शोधात भाजपा आहे. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जवळ घेण्याची तयारी भाजपा नेत्यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर या भेटीला प्रचंड महत्त्व आहे. भाजपा व शिवसेनेचा संसार 30 वर्ष टिकला कारण त्यांच्यातील मुळ धागा होता, तो हिदूत्त्वाचा! मात्र सेनेने धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नवा संसार थाटला असल्याने हिंदूत्ववादी विचारसरणीची अनेक मंडळी सेनेपासून दुरावत आहेत. त्यामुळे शिवसेनेपासून दुरावलेला हिंदुत्ववादी मतदार मनसेच्या माध्यमातून राज ठाकरे जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील सरकारवर खास ठाकरी शैलीत टीका करण्यासाठी राज यांच्यासारखा मित्र पक्ष जर भाजपला मिळत असेल, तर त्यांच्यासाठीही ही मोठीच राजकीय पर्वणी ठरते. यामुळे भाजपाने राज ठाकरेंबाबतचे धोरण थोडसे लवचिक केल्याचे दिसून येते. ही केवळ भाजपाची गरज आहे असे नाही कारण विद्यमान सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदासह एक कॅबीनेट मंत्रीपद ठाकरे कुटुंबातील व्यक्तीने पहिल्यांदाच स्वीकारल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. भाजपच्या विरोधाचे वारे राज्यात आणणार्‍या राज ठाकरे यांच्याकडे मात्र, त्यामुळे कोणताही नवा राजकीय पर्याय राहिलेला नाही. राज्यातील राजकारणात ‘एकला चलो रे’ ही भूमिका सध्या काहीही कामाची नसून, युती व आघाड्यांच्या या कालावधित मनसेदेखील दुसर्‍या पक्षाचा आधार पाहते आहे. त्यादृष्टीने राज ठाकरेंची पावले पडत असल्याचे दिसून येते. राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती, मनसेचा ओसरता प्रभाव आणि शिवसेनेला मात देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलून मनसेच्या झेंड्याचा रंग भगवा किंवा केशरी होणार असल्याचे बोलले जात आहे. याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे राज ठाकरे आता हिंदुत्वाचे कार्ड खेळण्याच्या तयार करण्याच्या तयारीत असून मनसेच्या कार्यकर्त्यांना उभारी देण्याबरोबरच राज ठाकरे मराठी अस्मितेसोबत हिंदुत्वाची मोट बांधण्याची शक्यता आहे. कारण मनसेच्या मराठी कार्डाचा प्रभाव ओसरताना दिसत आहे. 2014 आणि 2019 सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेचा फक्त एकच आमदार निवडून आला. त्यामुळेच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन पुढची खेळी खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी शिवसेनेला लक्ष केले होते. मात्र, निवडणूक निकालानंतर शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हातमिळवणी करत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. यामुळे मनसे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. आपण नेमके कुणाच्या बाजूने आहोत आणि कुणाच्या विरोधत, यात मनसे कार्यकर्ते गुरफटत चालले आहेत. राज ठाकरेंनी हा संभ्रम तातडीने दूर करण्याची आवश्यकता आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या बॅनर्सवर राज ठाकरे यांचे फोटो झळकल्यानंतर सुरु झालेली चर्चा आता आता राज-फडणवीस यांची भेट नंतर जास्तच रंगत असल्याने या नव्या समिकरणावर येत्या 23 जानेवारी रोजी होणार्‍या मनसेच्या अधिवेशनात राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितिन गडकरी म्हणाले होते की, क्रिकेट व राजकारणात काहीही होवू शकते, यानुसार भाजपाचा नव्या ‘राज’मार्गावरचा प्रवास सुरु होणे देखील फारसे आश्चर्य वाटायला नको!