भाजपाची गटबाजी चव्हाट्यावर

0

माजी मंत्री एकनाथराव खडसे व गिरीश महाजन समर्थक भिडले

भुसावळ: भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यातील सख्य सर्वांना ठावूक असतानाच गुरुवारी दुपारी भुसावळ भाजपा तालुकाध्यक्षपदाच्या निवडीप्रसंगी महाजन व खडसे समर्थक एकमेकांवर धावून गेल्याने भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. दरम्यान, इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे भाजपा तालुकाध्यक्षपदासह शहराध्यक्षपद निवडीचा निर्णय आता कोअर कमिटी घेणार आहे.

भाजपा भुसावळ तालुकाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कुर्‍हे पानाचे येथे गुरुवारी, रेणुका माता मंदिराच्या सभामंडपात पक्षाची बैठक खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. तालुकाध्यक्षपदासाठी वरणगावातील पदाधिकारी अर्ज भरत असताना गोटूशेठ चाहेल यांनी दोन दिवसांपूर्वीच वरणगावात निवड झाली असताना वरणगावचे पदाधिकारी येथे कसे? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भुसावळ तालुक्यात वरणगाव शहर येत नाही का? असा प्रतिप्रश्न करत दोन दिवसांपूर्वी वरणगावात संयोजकांच्या झालेल्या निवडीला स्थगिती देण्याची मागणी केली. आम्हीदेखील भाजपाचे निष्ठावान असून, बंदद्वार मोजक्या लोकांसोबत निवड झालीच कशी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी वरणगावचा व्यक्ती अध्यक्ष म्हणून नकोच, असा काही सदस्यांनी आवाज उठवताच सुनील काळे व इतर सदस्यांनी आमचा जर कुणी वेगळा अध्यक्ष असेल तर दाखवा नाहीतर आम्ही भाजपाचे नाही हे सिध्द करून दाखवा, आम्ही इथून निघून जातो, असे म्हटले. यावरून गोंधळ वाढून माजी मंत्री खडसे व माजी मंत्री महाजन यांचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून गेले.

निवडीचा चेंडू कोअर कमिटीकडे

16 सदस्यांनी भाजपा तालुकाध्यक्षपदासाठी अर्ज केला तर 6 सदस्यांनी माघार घेतल्याने उर्वरित 10 सदस्यांची नावे भाजपाच्या कोअर कमिटीकडे पाठवण्याचा निर्णय खासदार रक्षा खडसे यांनी घेतला. सुनील नेहते, किरण कळसकर, किरण चोपडे, प्रशांत पाटील, राजू चौधरी, अजय पाटील, रमेश पाटील, नागो पाटील, सुधीर जोहरे यांची नावे भाजपाच्या कोअर कमिटीकडे पाठवण्यात आली आहेत. या बैठकीला जि.प.चे माजी सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समाधान पवार, मनोज बियाणी, मनीषा पाटील, भाजपाचे जळगाव जिल्हा संघटक सरचिटणीस प्रा. सुनील नेवे, सरपंच रामलाल बडगुजर, उपसरपंच वासुदेव वराडे, वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे, सुधाकर जावळे, दिनेश नेमाडे, डॉ.भावे यांच्या सह तालुक्यातील सरपंच व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

भुसावळ शहराध्यक्षाची निवड खोळंबली

भुसावळात भाजपा शहराध्यक्षपद निवडीसाठी शहरातील जळगाव रोडवरील लोणारी समाज मंगल कार्यालयात गुरुवारी, सायंकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते मात्र, एका पदासाठी तब्बल 11 जण इच्छूक असल्याने व कुणाच्याही एकाच्या नावावर एकमत न होवू शकल्याने कोअर कमिटीकडे अहवाल पाठवून अंतिम निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहराध्यक्षपद निवडीसाठी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस अजय भोळे, निवडणूक निर्णय अधिकारी हर्षल पाटील, सहा.निवडणूक अधिकारी रमाशंकर दुबे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा. सुनील नेवे, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

शहराध्यक्षपदासाठी 11 जण इच्छुक

शहराध्यक्ष पदासाठी नगरसेवक किरण कोलते, परीक्षित बर्‍हाटे, गिरीश महाजन, देवा वाणी, शिशिर जावळे, खुशाल जोशी, वासू बोंडे, राजू खरारे, अविनाश बर्‍हाटे, रमाशंकर दुबे व विद्यमान शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे यांनी इच्छूक म्हणून अर्ज भरून दिले आहेत. मात्र, सायंकाळपर्यंत कुणाच्याही नावावर एकमत न झाल्याने पुरूषोत्तम नारखेडे, अविनाश बर्‍हाटे व रमाशंकर दुबे यांनी आपला अर्ज मागे घेतला. यानंतरही आठ जण इच्छूक असल्याने अहवाल कोअर कमिटीकडे पाठवून अंतिम निर्णय घेण्याचे ठरले.