भाजपाची महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा: धनंजय मुंडे

0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज यात्रेस शिवनेरी वरून सुरुवात

जुन्नर: राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ आज अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवनेरी किल्ल्यावरील जन्मस्थानी मातीनं भरलेला मंगल कलश हाती घेत झाला. नवस्वराज्य आणायचं, अशी शपथ घेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या महायात्रेला सुरुवात केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमि असलेल्या शिवनेरी किल्ल्याची पवित्र माती कपाळाला लावून शिवस्वराज्य यात्रेच्या प्रारंभीच हे दळभद्री सरकार उलथून टाकून, रयतेचे राज्य आणण्याचा निश्चय केला.

जुन्नर येथील पहिल्या सभेत बोलतांना भाजपाची महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा आहे असा टोला विधान परिषदे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावत त्यांनी मुख्यमंत्र्याच्या यात्रेला महा’धना’देश यात्रा म्हणत हिणवले. तर आदित्य ठाकरे यांची यात्रा मीच मुख्यमंत्री होणार हे सांगण्यासाठीची आहे अशी टीका त्यांनी केली. शिवस्वराज्य यात्रा जनतेच्या हितासाठी असल्याची ग्वाही त्यांनी केली.

72 हजार नोकऱ्यांसाठी मेगाभरती करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचे काय झाले? अहो तुम्ही तर आपल्या पक्षातच मेगा भरती सुरू केली आहे. भाजपामुळे राजकारणात गुन्हेगारीकरण वाढत चालल्याची दुर्दैवी चित्र समोर येत असल्याची टीकाही त्यांनी केली. हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

लोकशाहीचा चौथा स्तंभच आता बोलू लागलाय की भाजप म्हणजे काशीचा घाट झाला आहे. कितीही पापी माणूस तिथे गेला तरी शुद्ध होतो अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली. खोटं बोला पण रेटून बोला हा मुख्यमंत्र्याचा उद्योग सुरू आहे. म्हणे ५० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. मात्र आर्थिक अहवालात तर मुख्यमंत्र्यांचं हे ‘सत्य’ कुठेच नाही. मुख्यमंत्री साहेब, किती खोटं बोलवं याचे भान राखण्याची तंबी त्यांनी दिली. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, फोजिया खान, आ. विद्या चव्हाण, रुपाली ताई चाकणकर , शेख महेबुब आदी उपस्थित होते.