राष्ट्रवादीला उज्ज्वल निकमांचा सन्मान करायचा असल्यास राज्यसभेवर पाठवावे !

0

भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची दैनिक जनशक्तिला विशेष मुलाखत

जळगाव (जितेंद्र कोतवाल)- दहशतवादी व गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख असलेले अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांच्या नावा भोवती प्रचंड वलय आहे. याचा फायदा उचलण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु केली आहे. यासाठी त्यांना किंवा त्यांच्या कुटूंबियांना विश्‍वासास घेण्यात आले नाही. अ‍ॅड.निकम यांच्यासारखी प्रतिभावान व्यक्ती राजकारणात जरुर यायला हवी, परंतू त्यांना स्थानिक राजकारणात गोवणे कितपत योग्य आहे, याचा विचार करणे जरुरीचे आहे. राष्ट्रवादीला त्यांचा खरोखरच सन्मान करायचा असेल तर त्यांना थेट राज्यसभेवर पाठवावे, असे मत भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी व्यक्त केले.

उदय वाघ यांनी दैनिक जनशक्तिच्या कार्यालयात विविध विषयांवर दिलखुलास चर्चा करत जनतेच्या मनात असलेल्या प्रश्‍नांना स्पष्ट व परखड उत्तरे दिली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांचेच कार्यकर्ते नाकारायला लागले आहे. त्यामुळे कर्तुत्ववान असलेले नेते त्यांच्यात नाहीत. जळगाव जिल्ह्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासारखे दोन खंबीर नेतृत्व असलेले नेते भाजपात आहे. त्यामुळे आम्ही बुथ निहाय निवडणूक लढवीत असताना थ्री टायर सिस्टमच्या माध्यमातून संघटना उभी केली आहे. भाजपा एवढा सक्षम झालेला आहे, त्याला कुठल्याही पक्षाने भेदण्याचा कितीही प्रयत्न केला तरी काही होणार नाही. कारण आमच्याकडे प्रामाणिकपणे काम करणार्‍यांची फळी तयार झाली आहे. या फळीच्या माध्यमातूनच आम्ही जिल्ह्यात राज्यात सत्ता स्थापन होणार आहे, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी हा चोरी करणारा पक्ष
राष्ट्रवादी हा चोरी करणारा पक्ष आहे. बूथ संकल्पना किंवा जी रचना आहे ती रचना सर्वात अगोदर भाजपने आणले होते. त्यामुळे ही संकल्पना राष्ट्रवादीसह इतर पक्ष राबवित आहे. चोरी करणारा कधीही पास होत नाही. त्यांनी बुथ संकल्पनेचा किंवा रचनेच्या आधारावर आराखडा तयार केला असेला तर आम्ही देखील दोन पाऊल पुढे नक्कीच चालत आहोत. पक्ष किंवा संघटना यांच्यासोबत कार्यकर्त्यांची जोड लागते. ती जोड आमच्याकडे आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत. विरोधकांकडे उमेदवार नसल्यामुळे इकडे तिकडे व्यक्तीचे नावे सांगू लागले आहे. अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे नाव घेण्यात आले होते. यासाठी त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना विश्वासात न घेता उमेदवारीची चर्चा सुरु करणे चुकीचे आहे. त्यांच्यासारखी प्रतिष्ठित व्यक्ती या स्थानिकपातळीवरील राजकारणाला बळी पडेल असे मला वाटत नाही, असेही वाघ म्हणाले.

उदय वाघ यांच्याशी झालेले प्रश्नोत्तर

प्रश्न – भाजप आणि शिवसेना युतीचा का ताणला जात आहे?
उत्तर – राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत करायचे असेल तर युती होणे गरजेचे आहे. मात्र टाळी एका हाताने वाजत नाही, जर समोरील पक्ष तयार होत नसेल तर काही हरकत नाही, नाही तर आम्ही स्वबळावर निवडणुकीसाठी केव्हाही तयार आहे. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. आज जिल्ह्यात भाजपमय वातावरण आहे. आगामी होणार्‍या लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपा पक्ष त्यादृष्टीने तयारीला लागलेला आहे. त्यामुळे स्वबळावर देखील निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे.

प्रश्न – भाजपाच्या स्थानिक पातळीवरील सोईस्कर आघाड्यांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो हे सोईचे राजकारण जनता स्वीकारेल का?
उत्तर – स्थानिक पातळीवर सत्ता बसण्यासाठी काही वेळा तडजोडी केल्या जातात. अनेकवेळा तो निर्णय पक्षाचा नसतो तर स्थानिक नेत्यांचा असतो. मात्र आमची इच्छा युतीसाठी असते मात्र समोरुन प्रतिसाद मिळत नसल्याने काही वेळा चौकटीबाहेरचे निर्णय घ्यावे लागतात. भाजपा हा व्यक्तीवर नव्हे तर संघटनवर चालणारा पक्ष आहे. यामुळे सोबत कोणी आहे किंवा नाही याचा फारसा फरक पडत नाही.

प्रश्न – तिन राज्यांच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाची वाट बिकट वाटते का?
उत्तर – गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाला एक हाती सत्ता मिळाली होती. होवू घातलेल्या निवडणुकीत राज्यात आमदारपदासाठी राज्यातून दीडशेहून अधिक जास्त जागा येतील. आज केंद्रात आणि राज्यात भाजपा सत्ता असल्याने भाजपातर्फे शासकीय योजना राबवण्यात आल्या. जनतेच्या भल्यासाठी अनेक योजना राबवल्या. योजनांसह अनेक विकास कामे देखील केलेले आहेत. त्यामुळे ’और एक बार मोदी सरकार’ असा नारा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की जनता आम्हाला नक्की साथ देईल.

प्रश्न – नोटबंदी आणि जीएसटीमुळे भाजपाला फटका बसेल का?
उत्तर – मुळीच नाही, उलट आमच्या जागा वाढणार आहेत. जरी राजस्थान आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यात आम्ही थोड्यावर कमी पडलो पण तरीसुद्धा आम्ही हार मानली नाही. मोदी सरकारने केलेल्या कामात जनता विसरणार नाही. भाजपाने कामे केलेले आहेत तसेच चांगली चेहरे पण आमच्याकडे आहेत. विरोधी पक्षाकडे चांगले चेहरे आता उरलेले नाही. त्यामुळे आम्ही आगामी दोन्ही निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार आहे याची आम्हाला खात्री आहे.

प्रश्न – महाराष्ट्रात 48 जागा आहेत आता किती मिळू शकतील?
उत्तर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून दिला, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून पडून होती. त्याचे गांभीर्य लक्षात घेता, मराठा समाजाला आरक्षण दिले. दोन वर्षांपूर्वी फडणवीस सरकारने शेतकर्‍यांना देखील कर्जमाफीच्या माध्यमातून दिलासा दिलेला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दिक्षाभूमीला पर्यटन दर्जा असे काम फडणवीस सरकारच्या माध्यमातून झालेले आहे. कारण फडणवीस सरकारने जनतेची नाडी ओळखून कामे केलेली आहेत. राज्यातून सीएम चषकाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यात जवळपास 2 लाख खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे मागील निवडणुकीहून अधिक जागांवर उमेदवार यावेळी निवडून येतील.

प्रश्न – जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या कामांचे मुल्यांकन कसे कराल?
उत्तर – ज्यावेळी आघाडीचे सरकार होते. त्यावेळी माजी खासदार स्वर्गीय गुणवंतराव सरोदे आणि नानासाहेब उत्तमराव पाटील यांच्या प्रतिनिधी च्या माध्यमातून दोन भाजप नेत्यांचा आम्हाला वारसा लाभलेला आहे. जळगाव जिल्ह्यात दोन्ही खासदार भाजपाचेच आहे. दोन्ही खासदारांची कामगिरी देखील उल्लेखनीय आहे. त्यामुळे या निवडणुकीतही सुद्धा भाजपचेच दोन्ही खासदार राहतील. खासदार ए टी नाना पाटील आणि खासदार रक्षाताई खडसे या दोन्ही खासदारांनी आपापाल्यापरीने पक्ष वाढीसह त्यांच्या मतदारसंघात अनेक कामे झालेली आहेत.

प्रश्न – जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास आपण इच्छूक आहात का?
उत्तर – पक्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत माझ्याकडे जिल्हाध्यक्षपद दिले. दोन्ही वेळेस मी कार्यकर्ता म्हणून काम केलेले आहे. भाजपा पक्षाने नेहमी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. तसे बघितले तर माझ्या कडेराजकारणाची कुठलीही परंपरा नाही किंवा कुठलाही वारसा नाही. मी एक लहान खेड्या गावातून आलेला एक सामान्य व्यक्ती आहे. त्यामुळे पक्षाने माला नेहमीच न्याय दिला आहे. मला पक्षाचे जिल्हाध्यक्षपद आणि माझी पत्नी स्मिता वाघ यांना विधानपरिषदेचे सदस्यत्व मिळाले आहे. पक्षाने मला भरभरुन दिले आहे. पुढेही जर पक्षाने मला लोकसभेची संधी दिली तर मी निवडणूक लढविण्यास तयार आहे. कारण पक्षाने सांगितले तसे मी काम करणार आहे. उमेदवार कोणताही असो त्याला पक्ष संघटना पुर्णपणे पाठिंबा देईल.