पिंपरी-चिंचवड : पक्षीय राजकारणापर्यंत ठीक होते. परंतु, भाजप आता विकासकामामध्येही राजकारण करत आहे. भाजपकडून सुडाचे राजकारण केले जात आहे. चिंचवड मतदार संघातील विषय जाणीवपूर्वक अडविले जाताहेत. वाकड प्रभागातील कामे थोपविली जाताहेत. चिंचवड मतदार संघात भाजपचे लोक शिवसेनाला घाबरत आहेत, अशी टिप्पणी शिवसेनेचे शहरप्रमुख व पालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी केली.
सभापतींच्या सासर्याचा फोन
पत्रकारांशी बोलताना कलाटे म्हणाले, वाकड येथील बीआरटीचा रस्ता ताब्यात आला नाही. त्यामुळे त्या पैशांतून काळाखडक येथे रस्ता करायचा आहे. त्याचे स्थळ बदलायचा विषय होता. विधी समितीने मात्र तो विषय दाखल करुन घेतला नाही. विशेष म्हणजे या विषयाला आयुक्तांनी मान्यता दिली आहे. पूर्वी ताथवडे येथील एका रस्त्यासंदर्भात काम होते. त्यावेळी विधी समिती सभापतींच्या सासर्यांचा मला फोन आला होता. विधी समिती नेमके कोण चालवते?
पालकमंत्र्यांच्या केवळ घोषणा
हिंजवडीतील वाहतुकीसंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट बैठका घेतात. या बैठकीनंतर एवढा रस्ता करणार, हे करणार, ते करणार असे पत्रकार परिषद घेऊन सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात काहीच काम नाही. या बैठकीला स्थानिक नगरसेवकांना बोलविणे गरजेचे आहे. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींना बैठकीचे निमंत्रण देखील दिले जात नाही. परंतु, भाजपचे निवडणुकीला पराभूत झालेले उमेदवार बैठकीला उपस्थित असतात असा आरोप कलाटे यांनी केला.