भाजपाचे संघटन मजबूत न झाल्यास काँग्रेससारखी अवस्था होणार

0

माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या कानपिचक्या ; फैजपूरला रावेर विधानसभा क्षेत्राचा शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुखांचा मेळावा

फैजपूर- सध्याच्या परीस्थितीत काँग्रेस जवळ संघटन नाही त्यामुळे भाजपचे संघटन मजबूत करणे गरजेचे आहे अन्यथा आपली सुध्दा काँग्रेस सारखी परिस्थिती व्हायला नको, अशा कानपिचक्या माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे झालेल्या भारतीय जनता पार्टीचा रावेर विधानसभा क्षेत्राचा शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुखांच्या मेळाव्यात दिल्या. प्रसंगी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन सोमवारी सकाळी 10 वाजता खंडेराववाडी मंगल कार्यालयात खडसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

आगामी काळ सोशल मिडीयाचा
खडसे म्हणाले की, आताचा आणि आगामी काळ हा सोशल मिडीयाचा आहे त्यामुळे युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजना सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. आपला बूथ प्रमुख हा प्रभावशाली असला पाहिजे त्याला घराघरात जावून योजनांची माहिती सविस्तर देता आली पाहिजे. राष्ट्रीय अध्यक्ष अमिताशहा यांनी दोन वर्षापूर्वी बूथ अभियानाची संकल्पना मांडली होती बूथ जितो देश जितो त्या अनुषंगाने वन बूथ 30 युथ ही संकल्पना तयार केली आहे. संघटनेने युवकांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहिले पाहिजे आणि येणार्‍या निवडणुकीला आतापासून जोमाने कामाला लागा, रावेर विधानसभा मतदारसंघात विजय आपलाच असल्याचे खडसे म्हणाले.

बुथ प्रमुखांच्या माध्यमातून लढवल्या जातील आगामी निवडणुका -खासदार
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, येणार्‍या निवडणुका या बुथ प्रमुखांच्या माध्यमातून लढविल्या जाणार आहे. केंद्र सरकारने 42 योजना जनतेसाठी अंमलात आणल्या आहेत त्या योजना सामान्य नागरीकांपर्यंत पोहचविण्याचे काम बुथ प्रमुखांचे आहे. या सर्व योजनांची माहिती व एखादी योजना आपण नागरीकाला मिळवून दिली तर 90 टक्के मतदान हे भारतीय जनता पार्टीला झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वात मोठी ताकद ही बुथ प्रमुखांची असते. सीएम चषकच्या माध्यमातून ग्रामीण भागाशी निगडीत खेळ युवा वर्गाला मोठी संधी भाजप सरकार देत आहे. ज्या युवांच्या अंगी कला आहे त्याच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. गेल्या 2014 च्या निवडणुकीत देशातील युवकांची ताकद ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभी होती तीच ताकद या येणार्‍या निवडणुकीत आपल्याला पुन्हा दाखवून द्यायची आहे. बीएसएनएलचे 60 टॉवर या मतदारसंघात सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. आपल्या भागात कामे भरपूर होत आहे पण त्या कामांची प्रसिद्धी होत नाही जो कामे करतो त्यांच्याकडे नागरीक अपेक्षेने बघत असता, असे खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.

नरेंद्र मोदी स्वच्छ प्रतिमेचे पंतप्रधान -अस्मिता पाटील
अस्मिता पाटील यांनी केंद्र व राज्यसरकारची उपलब्धी या विषयावर सांगितले की, एक स्वच्छ प्रतिमा असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले. येणार्‍या काळात भारत हा महासत्ता झालेला देश असेल. चार वर्षात अनेक योजना गोरगरीबांसाठी केंद्र सरकारने आणल्या आहे. 2022 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे की शेवटच्या नागरीकाला राहण्यासाठी हक्काचे घर मिळावे. दहशतवाद मिटवण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले.

बुथप्रमुख हा पक्षाचा कणा -आमदार जावळे
आमदार हरीभाऊ जावळे यांनी सांगितले की, बुथप्रमुख हा पक्षाचा कणा आहे तो सक्षम असला तर निवडणूक जिंकणे कठीण नाही. प्रत्येकाने पक्षासाठी संघटन बांधणीसाठी मेहनत घेणे गरजेचे आहे. येणार्‍या निवडणुकीत पुन्हा पक्षाची ताकद आपल्या सर्वांना दाखवून द्यायची आहे. बुथप्रमुखांना निवडणुकीत मेहनत घेवून भारतीय जनता पार्टीला जास्तीत-जास्त मतदान कसे होईल या विचार करायचा आहे. केंद्र सरकार व राज्यसरकार यांच्या योजना जनतेला समजून सांगा, असेही ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती
प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विलास चौधरी तर आभार विजय नरवाडे यांनी मानले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा संघटन सरचिटणीस डॉ.सुनील नेवे, सरचिटणीस हर्षल पाटील, माजी सभापती हिरालाल चौधरी, रावेर पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, फैजपूर नगराध्यक्ष महानंदा होले, प्रदेश सदस्य बी के.चौधरी, जिल्हा दुध संघ संचालक हेमराज चौधरी, जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील, सविता भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील, पंचायत समिती गटनेते दीपक पाटील, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उजैनसिंग राजपूत, नगरसेवक मिलिंद वाघुळदे, विजय नरवाडे, कांचन फालक आदींची उपस्थिती होती.