भाजपाच्या अंतर्गत वादामुळे अधिकार्‍यांची डोकेदुखी

0

अंतर्गत गटबाजीमुळे प्रशासनाला त्रास

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राम-लक्ष्मणाच्या जोडीने कमळ फुलविले आहे. मात्र अंतर्गत गटबाजीमुळे या जोडीला नजर लागली आहे. या दोघांतील शीतयुध्दाचा परिणाम महापालिकेतील अधिकार्‍यांनादेखील भोगावा लागत आहे. वाकड येथील भूमीपूजनाच्या कार्यक्रमात चिंचवडच्या आमदारांना डावलले गेले. आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते भूमीपूजन उरकल्यामुळे चिंचवड गटाला चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्यावर स्थायी समितीमधून ईमेल पाठविणार्‍या त्या अधिकार्‍यांची चौकशी करून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अनेक अधिकारी या प्रकरणामुळे चांगलेच धास्तावले असून, नेमके काम कसे करावे अशी संभ्रमावस्था यांच्यामध्ये झाली आहे.

विचारांमध्ये मोठी तफावत
गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता गाजविली आहे. पंधरा वर्ष सत्ता असल्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्यात आणि अधिकार्‍यांमध्ये चांगलीच गट्टी झाली होती. मात्र पंधरा वर्षानंतर राजकीय परिवर्तन घडले आणि भाजपाने महापालिकेवर सत्ता काबीज केली. सत्तातराचा सर्वाधिक फटका आणि डोकेदुखी ही अधिकार्‍यांना सहन करावी लागते आहे. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना महापालिकेची इत्यंभूत माहिती नसल्यामुळे अधिकार्‍यांच्या आणि त्यांच्या विचारामध्ये मोठी तफावत आहे. महापालिकेच्या काही विभागातील अधिकारी निर्ढावलेले आणि नगरगट्ट असल्यामुळे नगरसेवकांनी कितीही बोलले तरी काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे या निगरगट्ट स्वभावाच्या अधिकार्‍यांसोबत चांगल्या अधिकार्‍यांची फरफट होते आहे.

अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी
स्थायी समितीमध्ये आपला दरारा वाढवण्यासाठी किरकोळ कारणावरून संबंधित अधिकार्‍यांना छोट्या छोट्या विषयांवरून धारेवर धरले जाते. वाकड येथील भूमीपूजनाच्या विषयांवरून स्थायीमधील काही सदस्यांनी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यावरून महापालिकेच्या अनेक विभागांमध्ये अधिकार्‍यांची या विषयावरून चर्चा सुरु आहे. भाजपाच्या अंतर्गत गटबाजीमुळे आणि वादामुळे नेमके काम कसे करावे असा सवाल अधिकारी वर्ग करत आहे.