भाजपाच्या केंद्रस्थानी ग्रामीण जनता, शेतकरी

0

जळगाव । जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे जोरात असुन सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. सर्वच पक्ष प्रचाराच्या माध्यमातून गट व गण पिंजुन काढणार आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीचा जाहिरनामा व पक्षाचा वचननामा तयार करण्यात आला असुन तो जनतेपर्यत पोहचविण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाने बुधवारी 8 रोजी राज्याचे महसुलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचा वचननामा प्रसिध्द केला. गाव आणि गावातील माणसाला पक्षाने केंद्रस्थानी मानले असुन त्यांच्यासाठीच सर्व योजना राबविली जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. पक्षाने जाहिरनाम्याच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण जनतेमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

कर्जमाफी नाही, स्वयंपुर्णसाठी प्रयत्न

कर्जमाफीच्या विषयावरुन सरकारला विरोधक वारंवार धारेवर धरण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र कर्जमाफी हा भाजपाचा उद्देश नसुन शेतकरी स्वयंपुर्ण करणे हाच पक्षाचा मुळ उद्देश आहे. शेतकर्‍याला स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी आणि त्याला सक्षम करण्यासाठीच पक्ष प्रयत्न करणार आहे. शेतकरी सक्षम झाल्यावर जर तो दुर्देवाने कर्जाच्या खाईत लोटला गेला तरच शेतकर्‍यांला कर्जमाफी दिली जाईल. असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

पक्षात ‘मतभेद’ परंतु ‘मनभेद’ नाही

भारतीय जनता पक्षात अंतर्गत कलह असल्याचे बोलले जात आहे. पक्षाने पक्षनिष्ठा आणि निवडुण येण्याची पत असलेल्यांना उमेदवारांनाच उमेदवारी दिली आहे. पक्षाचे उमेदवार हे पक्षाच्या निती नुसार आहे. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये ‘मतभेद’ असु शकतील परंतु ‘मनभेद’ नाही. सर्वच कार्यकर्ते पक्षासाठी एकमताने आणि एकदिलाने काम करीत आहे. कार्यकर्त्यांची ताकद हिच पक्षाची ताकद आहे. असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

भाजपा प्रदेशस्तरीय समिती सदस्यपदी आमदार वाघ

भारतीय जनता पार्टीतर्फे महाराष्ट्रातील निवडणुका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश स्तरीय समिती तयार करण्यात आली आहे. ही पाच सदस्यीय समिती आहे. यात जळगाव जिल्ह्यातील आमदार स्मिता वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. समितीच्या अध्यक्षस्थानी आमदार सुजितसिंह ठाकुर हे आहेत. आमदार मंगलप्रभात लोढा प्रदेश उपाध्यक्ष, आमदार नीता केळकर प्रदेश उपाध्यक्ष, आमदार अनिल सोले प्रदेश सचिव, आमदार स्मिता वाघ यांची प्रदेश सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे.

वचननाम्यातील इतर विषय

शुध्द पाणी पुरवठा करणे, लोकसहभागतून विकास, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा वाढविणे, स्वच्छता, जिल्हा परिषदेच्या शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विकास करणे, जि.प.शाळांना इंटरनेट मोडेम आणि प्रिंटर देणे, जिल्ह्यात स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबविणे, ग्रामीण भागात रस्ते, पाणी, आरोग्य या सुविधांसह वाचनालय, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रे, व्यायामशाळा केंद्रे, जनगिरी सुविधा केंद्रास
विकसीत करुन पं.दिनदयाल उपाध्याय यांच्या संकल्पनेतुन ग्राम उदय करणे, अपघातात मयतांच्या कुटुंबीयांना विमा संरक्षण आदी विषयांवर पक्ष सत्तेत आल्यावर भर देणार असल्याचे वचननाम्याच्या माध्यमातून जाहिर करण्यात आले.