वरणगाव पालिकेत सत्ताधार्यांचा अनधिकृत कामांचा सपाटा -नितीन माळी ; जनहितासाठी हजारो गुन्हे दाखल झाले तरी पर्वा नाही -नगराध्यक्ष सुनील काळे
भुसावळ (गणेश वाघ)- तालुक्यातील वरणगाव पालिकेच्या निवडणुकीत भाजपात दोन गट निर्माण झाल्यानंतर कधी काळी नाथाभाऊंचे कट्टर समर्थक असलेल्या सुनील काळेंनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे नेतृत्व स्वीकारत स्वतंत्र चुल मांडत पालिका निवडणूक लढवली होती तर माजी मंत्री एकनाथराव खडसे गटातील नगरसेवकांनी या निवडणुकीत कडवी झुंज दिली होती मात्र अन्य पक्षीयांचे समर्थन घेत काळे या निवडणुकीत सरस ठरून त्यांची नगराध्यक्ष पदावर वर्णी लागली होती. या निवडणुकीत ‘गटनेता’ फॅक्टर महत्त्वाचा ठरला तर नंतर हे प्रकरण न्यायालयापर्यंतही पोहोचले होते. वर्षभराच्या कालावधीत भाजपेयी असलेल्या मात्र दोन नेत्यांचे समर्थक असलेल्या पदाधिकार्यांमध्ये या ना त्या कारणातून खटके उडाले व आताही त्याचे पडसाद पालिकेच्या सर्वसाधारण बैठकांमध्येही उमटू लागले आहेत. 10 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेवरून आता भाजपातील सत्ताधार्यांमध्ये वाद वाढला असून ही बैठक रद्द करावी तसेच त्यातील सर्व विषय नामंजूर करण्याची मागणी भाजपाच्या खडसे गटातील समर्थकांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. खडसे समर्थकांनी या प्रकरणात मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची सूतोवाच केले असून नगराध्यक्षांनी मात्र शहर विकासासाठी हजारो गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर, अशी भावना व्यक्त केल्याने वरणगावात ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण मात्र तापले आहे.
10 रोजीच्या सभेत बेकायदा उघडल्या निविदा -नितीन माळी
नगरसेवक नितीन माळी यांच्या तक्रारीनुसार, 10 रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक 3 ते 26 हे निविदांचे विषय होते व अजेंड्यानुसार मुख्याधिकार्यांनी कमी दराच्या निविदेला प्राधान्य देत या विषयाला अनुमती देत असल्याचा अभिप्राय दिला होता मात्र आम्ही जिल्हाधिकार्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर मुख्याधिकारी बबन तडवी यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना दिलेल्या संदर्भ पत्रात या सभेत केवळ विषय क्रमांक 1, 2, 9 तसेच 22 व 24 ते 42 या विकासकामांच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. उर्वरीत ठराव क्रमांक तीन ते आठ व 10 ते 15 या ठरावांना तांत्रिक अडचणींमुळे स्थगित ठेवण्यात आले. सुमारे 15 मिनिटे सभेचे कामकाज चालले व त्याबाबत व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आल्याचे 13 रोजी जिल्हाधिकार्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. सत्ताधार्यांनी सभागृहाची दिशाभूल करीत अनधिकृत कामांचा सपाटा लावल्याचे नितीन माळी यांनी सांगत बहुमताने मंजूर केलेले विषय आता त्यांच्या अंगलट येणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकारातील दोषी मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षांविरुद्ध आम्ही कायदेशीर दाद मागू, असे सांगून ते म्हणाले की, जर निविदा उघडण्यातच आली नाही मग मुख्याधिकार्यांची टिपणी कशी ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
शहर विकासासाठी गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर -नगराध्यक्ष
मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात शहराचा झालेला विकास काहींना पाहवला जात नसल्याने त्यांना पोटदुखीचा आजार झाला आहे. वरणगाव पालिकेच्या सभेत सर्व विषयांवर नियमानुसार कामकाज झाले, काही टेंडर उघडण्यात आले तर काही टेंडर तांत्रिक अडचणीमुळे उघडता आले नाहीत, अशी भावना नगराध्यक्ष सुनील काळे यांनी व्यक्त करून शहरात विकासकामे सुरू असून विकासकामांची घोडदौड कायम राहणार असून शहर विकासासाठी हजारो गुन्हे दाखल झाले तरी डगमगणार नाही, अशी भावनाही त्यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना व्यक्त केली. वरणगाव पालिका सभागृहात नगराध्यक्ष पदाचा मानही काहींना राखता येत नाही, ही बाब दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.
पालिकेची सभा पारदर्शीच -मुख्याधिकारी
वरणगाव पालिकेची सभा नियमांप्रमाणे व पारदर्शी पद्धत्तीने झाली. कुठलेही चुकीचे काम केले नसल्याने घाबरण्याचे कारण नाही, ज्यांना आमच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावयाचे आहेत त्यांनी खुशाल करावेत, मी दोषी असल्यास माझ्यावर कारवाई होईल, अशी भावना मुख्याधिकारी बबन तडवी यांनी व्यक्त केली.