भाजपाच्या नगरसेवकाची सफाई कामगारास मारहाण

0

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या प्राध्यापक नगरसेवक उत्तम केंदळेंनी सफाई कामगाराच्या थोबाडीत मारल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेनंतर सफाई कामगारांनी पोलिस चौकीत ठिय्या मांडला. याची दखल घेत पोलिसांनी दखलपात्रऐवजी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. गणेश जगताप असे मारहाण झालेल्या कामगाराचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपचेच नगरसेवक केशव घोळवे यांना चाकण येथे स्थानिक गुंडांनी मारहाण केली होती.

उलट उत्तर दिल्याने कानाखाली लगावली…

केंदळे यांच्या प्रभागात औषध फवारणीचे काम जगताप यांना देण्यात आलेले होते. ते काम न करता झाडाखाली अर्धा तास मोबाईलवर बोलत बसल्याने त्याचा जाब केंदळेंनी विचारला. त्यावर उलट उत्तर दिल्याने त्याच्या दोन कानाखाली मारल्याचे केंदळे म्हणाले. गेल्या तीन महिन्यापासून औषध फवारणी न केल्याने प्रभागात साथीचे रोग पसरल्याने त्यांनी सांगितले.

शिवसेनेकडून जाहीर निषेध…

या निंदनीय कृत्याचा शिवसेना राहटणी-काळेवाडी विभाग व शिवशाही व्यापारीसंघ यांच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त केला असून, यापुढे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ठेकेदार कर्मचार्‍याच्या विरूद्ध पुन्हा असे कृत्य केल्यास, त्यास शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.