जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निर्णय
पुणे : महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका किरण जठार यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. या आदेशावर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वाक्षरी केली आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक एक (ए) कळस-धानोरी या प्रभागात अनुसूचित जाती-महिला असे आरक्षण होते. मनपाच्या 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जठार विजयी झाल्या होत्या. निवडणुकीनंतर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी त्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. हे प्रमाणपत्र अवैध ठरल्यावर जठार यांनी उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र, दोन्ही ठिकाणी त्यांच्या पदरी निराशाच पडली. मनपा आयुक्त राव यांनी हे प्रकरण राज्य निवडणूक आयोग आणि नगरविकास विभागाकडे पाठविले होते. निवडणूक आयोगाकडून आदेश मिळाल्यानंतर राव यांनी जठार यांचे नगरसेवकपद रद्द ठरविण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. या प्रकरणाचा दिलीप ओरपे आणि माजी नगरसेवक हुलगेश चलवादी पाठपुरावा करीत होते.