भाजपाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी दीपक सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड

0

पाच जणांची माघार : माजी नगरसेवक सुनील माळींची नाराजी कायम

जळगाव – भारतीय जनता पार्टीच्या महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी पाच इच्छुक उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे दीपक सुर्यवंशी यांची महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान माघार घेतांना माजी नगरसेवक सुनील माळी यांनी नाराजी कायम असल्याचे सांगितले.
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुकीतील महानगर जिल्हाध्यक्ष निवडीची प्रतिक्रीया आज ब्राह्मण सभेत पार पडली. यावेळी माजी मंत्री आ. गिरीश महाजन, निवडणुक निर्णयाधिकारी विजय साने, नाशिकचे उपाध्यक्ष अनिल भालेराव, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, आ. स्मिता वाघ, आ. चंदूलाल पटेल, आ. राजूमामा भोळे, महापौर सीमा भोळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, सहा. निवडणूक निर्णयाधिकारी दीपक साखरे आदी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेच्या सुरवातीला मावळते अध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी मनोगत व्यक्त केले.
अशी झाली निवडणूक प्रक्रिया
निवडणूक प्रक्रियेवेळी इच्छुक उमेदवारांचा परिचय करून घेण्यात आला. त्यात मनपा नगरसेवक सुनील खडके, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते चंद्रकांत बेंडाळे, प्रा. डॉ. अस्मीता पाटील, उदय भालेराव, सुनील माळी आणि दीपक सुर्यवंशी या सहा जणांनी अध्यक्षपदासाठी इच्छा दर्शविली. इच्छुकांचा परिचय झाल्यानंतर माघारीची प्रक्रिया घेण्यात आली. सुरवातीला प्रा. डॉ. अस्मीता पाटील यांनी माघार घेतली. त्यानंतर पाचही इच्छुक उमेदवार अध्यक्षपदासाठी स्पर्धेत कायम राहील्याने त्यांच्या चर्चा करण्यात आली. अध्यक्षपदासाठी माघार होत नसल्याने आ. गिरीश महाजन यांना मध्यस्थी करावी लागली. अखेर महाजनांची मध्यस्थी यशस्वी ठरली. पाच उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपा महानगर जिल्हाध्यक्षपदी दीपक सुर्यवंशी हे बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक अधिकारी विजय साने यांनी जाहीर केले.
सुनील माळींचा नाराजीचा सुर
महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक सुनील माळी यांनी संधी देण्याची विनंती केली. मात्र पक्षनेतृत्वाने माघार घेण्यास सांगितल्याने त्यांनी माघार घेतली. माघार घेत असतांना पक्षनेतृत्वाच्या आदेशानुसार पण मनाविरूध्द नाराजी कायम ठेवत या स्पर्धेतुन आपण माघार घेत असल्याचे सुनील माळी यांनी जाहीर केले.