भाजपाच्या मोर्चाने रावेर दणाणले

राज्याने इंधनावरील कर कमी करण्याच्या मागणीसाठी भाजयुमोतर्फे मोर्चा

रावेर : केंद्र शासनाने पेट्रोल व डिझेलचे भाव कमी केले असून दुसरीकडे महाराष्ट्र शासन पेट्रोल व डिझेलवर भरमसाठ कर आकरणी करीत असल्याने महाराष्ट्रीयन जनतेवर घोर अन्याय होत आहे. याबाबत भाजपा युवा मोर्चा तर्फे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, 25 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्तारोको तर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी नायब तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन देण्यात आले.

इंधन दर कमी करण्याची मागणी
महाराष्ट्र हे संपूर्ण देशात पेट्रोलसह डिझेलवर सर्वात जास्त कर आकारणारे राज्य असून जनतेच्या हितासाठी व महागाई कमी करण्यासाठी तत्काळ इंधनावरील कर कमी करण्यात यावे, संपूर्ण देशातील इतर राज्य 17 ते 18 रुपये कर आकारत असतांना महाराष्ट्र सरकारमधील महाविकास आघाडीन सरकार मोठ्या प्रमाणात आकारत असलेल्या करामुळे जनतेवर मोठा अन्याय होत आहे. महागाईला आळा बसण्यासाठी इंधन दरात कपात करावी व 72 तासात पावले न उचलल्यास राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
भाजपाच्या मोर्चात भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समितीचे माजी सदस्य जुम्मा तडवी, धनगर समाजाचे नेते संदीप सावळे, वासु नरवाडे, नितीन पाटील, उमेश कोळी, मनोज धनगर, महेंद्र पाटील, शुभम पाटील, प्रमोद चौधरी, सी.एस.पाटील आदी युवा मोर्चाचे पदादिकारी सहभागी झाले.