खा. शरद पवारांची सुरक्षा काढून घेतल्याच्या निषेधार्थ आंदोलन
जळगांव : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्र पवार यांची सुरक्षा हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ह्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज थाळीनाद आंदोलनाने उत्तर देऊन या कृतीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी असलेली सुरक्षा केंद्र सरकारने हटविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधुन भाजपाविरूध्द राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांकडुन संताप व्यक्त केला जात आहे. भाजपा सरकारच्या या हुकूमशाही कृतीला जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली थाळीनाद करून जोरदार उत्तर देण्यात आले आहे. महानगर राष्ट्रवादीतर्फे आज शहरातील आकाशवाणी चौकात महिला पदाधिकार्यांनी थाळीनाद करीत भाजपा सरकारविरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदविला.
सत्ता परिवर्तन भाजपाच्या जिव्हारी
आंदोलनासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जनसामान्यामधून आलेल्या लोकनेत्याला तुमच्या सुरक्षिततेची गरज नाही. जनतेच्या प्रेमाचे भरभक्कम कवच चहुबाजूंनी आहे. पण तरीही भाजपच्या सडक्या विचारांचा तीव्र निषेध राष्ट्रीवादीचे पदाधिकारी करत आहे. या कृतीवरून भाजप सरकारची मनोवृत्ती अतिशय अस्वस्थ, कुटील आणि दांभिक प्रवृत्तीची आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत महराष्ट्रातील सत्ता परिवर्तन भाजपच्या जिव्हारी लागले असल्याचा आरोप महानगर राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. त्यामुळेच भाजपा आता सुडबुध्दीने वागत आहे. हे लोकशाहीसाठी घातक असुन अत्यंत महत्वाच्या व्यक्तींसाठी असलेली सुरक्षा ही पूर्वसूचना न देता काढून घेतली आहे. सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक भूमिका घेईल असा इशारा अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यांची होती उपस्थिती
आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, ललित बागूल, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, सामाजिक न्याय विभागाचे अरविंद मानकरी, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष अझर पठाण, स्वप्नील नेमाडे, सुशिल शिंदे, फिरोज शेख, हर्षवर्धन खैरनार, पराग पाटील, रोहन सोनवणे, गणेश निंबाळकर, रियाझ काकर, कौसर काकर, मिनल पाटील, लता मोरे, ममता तडवी, चंद्रकांत चौधरी, संजय चव्हाण, कमलबाई पाटील, प्रशांत राजपुत, विशाल देशमुख, आशा आंभोरे, मिनाक्षी चव्हाण, जयश्री पाटील, संगीता बागुल, शोभा भोईटे, जयेश पाटील, गौरव वाणी, अक्षय वंजारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.