भाजपातर्फे धरणगावात पाण्यासाठी उद्या अर्धनग्न निषेध मोर्चा

धरणगाव- येथील नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या दि. ८ रोजी पाण्यासाठी अर्धनग्न निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
शहरातील पाण्याची परिस्थिती दिवसें-दिवस बिकट होत आहे. गेले २० ते २२ दिवसापासून धरणगाव शहरात नळाला पाणी आलेले नाही. सध्या लग्न समारंभ व विविध कार्यक्रम शहरातील नागरिकांकडे आहेत. त्यात पाण्याचा तुटवड्यामुळे नागरीक बेहाल झाले आहेत. मागील वेळेस भारतीय जनता पार्टीने पाण्यासाठी जनआक्रोश हंडा मोर्चा काढण्यात आला होता. तरी सुस्त प्रशासन व सत्ताधारी नगराध्यक्ष, नगरसेवक लोकांचे जाणीव पूर्वक हाल करत आहेत. झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी तर्फे अर्धनग्न निषेध मोर्चा काढण्यात येणार असून नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपातर्फे करण्यात आले आहे.