भाजपातल्या पक्षसंघटना व मंत्रिमंडळातल्या फेरबदलाची शक्यता

0

मुंबई – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळातल्या कोणत्या मंत्र्यांला मोकळे करायचे तसेच त्याऐवजी कोणाला स्थान द्यायचे याची चाचपणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या येत्या २६ व २७ तारखेला मुंबईत होणाऱ्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि भाजपाच्या कोअर कमिटीच्या सदस्यानी चर्चा केल्याचे कळते. या बैठकीत सरकारच्या तसेच पक्षाच्या गेल्या काही महिन्यातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी काय करावे लागेल, नव्याने होणाऱ्या पक्षप्रवेशाबाबत काय धोरण असावे, याबाबतही प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक भुवनेश्वरमध्ये नुकतीच झाली. मुख्यमंत्री फडणवीस या बैठकीला हजर होते. पुढच्या लोकसभा तसेच काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांवर यावेळी चर्चा झाली होती. याखेरीज मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या भूमिकेबद्दल तसेच नजीकच्या काळात होऊ घातलेल्या महत्त्वाच्या पक्षप्रवेशाबद्दल पक्षाध्यक्ष अमित शाह तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली होती. या बैठकीतील मार्गदर्शनानुसार प्रदेश कार्यकारिणीत कोणते विषय घ्यायचे यादृष्टीने आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चाचपणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव, या तीन महापालिकांच्या निवडणुका येत्या २६ मे रोजी निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमधील प्रचाराची रणनितीवरही आज चर्चा झाली. नुकत्याच झालेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेऊन त्यावर प्रदेश कार्यकारिणीत चर्चा करताना सरकार व पक्षसंघटनेत आवश्यक असलेल्या बदलाच्या अनुषंगानेही आज चर्चा झाल्याचे कळते.