जळगाव। जि ल्ह्यात भाजपात दोन गट सक्रीय असल्याचे उघड आहे. जिल्ह्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे भाजपाचे दोन दिग्गज नेते आहे. दोन्ही नेत्यांची पक्ष उभारणीसाठी महत्त्वाची भुमिका आहे. परंतु मागील काही वर्षापासून दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहे. दोन्ही नेत्यांमधील मतभेदांमुळे पक्षात दोन गट निर्माण झाले आहे. नुकतीच जिल्हा परिषदेची निवडणुक पार पडली आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीवरुन भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उघड झाले आहे. विषय समिती सभापती निवडतांना विश्वासात घेतले नसल्याने भाजपातील एक गट नाराज असून मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एकाच पक्षात दोन गट निर्माण झाल्याने जिल्हा परिषद सदस्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. सदस्यांमधील समन्वयाचा अभाव हा जिल्ह्याच्या विकासासाठी अडचणीचा ठरु शकतो.
उपाध्यक्ष बनले नामधारी
मागील काही पंचवार्षीक पासून जिल्हा परिषदेतील बांधकाम, अर्थ समितीचे सभापती पद हे उपाध्यक्षाकडे देण्यात येत होते. मात्र यावेळी बांधकाम व अर्थ समिती उपाध्यक्षांकडून काढून घेण्यात आली. त्यांच्याकडील महत्वाचे पद काढून घेण्यात आल्याने ते नामधारी बनले आहे. उपाध्यक्ष हे खडसेंचे निकटवर्तीय मानले जातात. अर्थ समिती सभापतीपद पोपट भोळे तसेच बांधकाम सभापतीपद रजनी चव्हाण हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. महाजन गटांनी खडसें गटावर वरचढ झाल्याचे दिसते.
नियम झुगारुन केली सभापती निवड
जनतेने मोठ्या विश्वासाने भाजपाला जिल्हा परिषदेत पहिल्यांदा एक हाती सत्ता दिली आहे. मात्र भाजपात दोन गट सक्रीय असल्याने पदाधिकारी निवडतांना दोन्ही गटात मोठी स्पर्धा निर्माण झाली. महत्वाचे पद राखण्यासाठी दोन्ही गटात जोरदार रस्सी खेच सुरु झाली. पहिल्यांदा झालेल्या जिल्हा परिषद सभापती निवडीत दोन सभापतींना पद वाटप करण्यात आले. विषय समिती सदस्य निवडीप्रसंगी महिला बाल कल्याण समिती सभापतीपदावर विराजमान असलेल्या रजनी चव्हाण यांना नियमबाह्य बांधकाम समिती सभापतीपद देण्यात आले. ही समिती मागील दहा वर्षापासून उपाध्यक्षांकडे होती. त्यामुळे भाजपा सदस्यांमध्ये नाराजी आहे.
उशीरा पद वाटप तरीही…
भाजपाने जिल्हा परिषदेत एक हाती सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेसच्या सदस्यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिला. कॉग्रेसच्या एका सदस्याला सभापतीपद देण्यात आले. विषय समिती सदस्य निवड करण्यासाठी 18 एप्रिल रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. मात्र महत्वाच्या समितीत पद मिळावे यासाठी भाजपता रस्सीखेच सुरु झाल्याने सदस्य निवड पुढे ढकलण्यात आली. सर्व चाचपणी करुन सदस्य निवड करण्यात आली मात्र योग्य रित्या निवडी न झाल्याने नाराजी आहे.
महाजन गट झाले वरचढ
एकनाथराव खडसे व गिरीश महाजन गटाची कुरघोडी सुरुच असल्याचे आज पर्यत दिसून आले. कॉग्रेसने भाजपाला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिल्याने खडसे आर.जी.पाटील यांना सभापतीपद देण्यासाठी आग्रही तर महाजन दिलीप पाटील यांच्यासाठी अखेर दिलीप पाटील सभापती निवड, उपाध्यक्षांकडील बांधकाम, अर्थ समिती काढून महाजन गटाच्या रजनी चव्हाण, पोपट भोळे यांच्याकडे आदींवरुन महाजन गट खडसे गटावर वरचढ झाल्याचे दिसून येते.
मुस्कट दाबीचा प्रयत्न
घर फिरले की घराचे वासेही फिरतात अशी म्हण आहे. अशीच काहीशी परिस्थिती खडसे गटाची झाली आहे. महाजन गट खडसे गटावर वरचढ होण्याची एकही संधी सोडत नाही. जिल्हा परिषद समिती वाटपावरुन खडसे गट नाराज आहे. मात्र उघड उघड विरोध कोणीही करत नसल्याचे दिसत आहे. खडसे गटाने नेते आमची मुस्कट दाबी होत असल्याची भावना इतरत्र व्यक्त करत आहे.