भाजपातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर

0

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा; निविदा प्रक्रियेतील घोळ, ग्रामपंचायत, आरोग्यावरून गाजली सभा

जळगाव: मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात प्रयोगशाळा निर्मितीसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र कोट्यावधीच्या कामाबद्दल जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह कोणत्याही सभेत हा विषय अवलोकनार्थ ठेवण्यात आलेला नसल्याने सदस्यांनी याला विरोध करत टेंडर प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली. यावरून माजी शिक्षण सभापती पोपट भोळे विरुद्ध माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सदस्य मधुकर काटे, सदस्या पल्लवी सावकारे असे चित्र दिसून आले. यावरून भाजपातील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. संपूर्ण सभागृहाने या निविदेला विरोध केल्याने अखेर टेंडर प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आली आहे. मंगळवारी अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. ही सभा शिक्षण विभागाचे टेंडर, ग्रामपंचायत वसुली, आरोग्याच्या विषयांवरून गाजली.

यांची होती उपस्थिती

सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील. उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण सभापती रवींद्र पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, उज्वला माळके, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदीवे उपस्थित होते.

पोपट भोळेंचा वैयक्तिक स्वार्थ?

माजी शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी सभापती असतांना हा विषय समितीपुढे ठेवला होता. मात्र अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना कळविले नसल्याची कबुली दिली. विद्यार्थी हिताचा हा निर्णय असल्याने या टेंडरला स्थगिती देण्यात येऊ नये अशी मागणी भोळे यांनी केली. मात्र टेंडर प्रक्रियेत घोळ असून त्याबद्दल कोणालाही कल्पना नसल्याने निविदा प्रक्रिया नव्याने राबविण्यात यावी अशी मागणी माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, मधुकर काटे, पल्लवी सावकारे यांनी केली. या निविदेत माजी सभापती पोपट भोळे यांचा वैयक्तिक स्वार्थ असल्याचे आरोपही भाजपच्याच सदस्यांनी केला.

नंदू महाजन, गोपाल पाटील यांच्यात खडाजंगी

ग्रामपंचायतची पाणीपट्टी वसुली होत नसल्याने याला जिल्हा परिषद सदस्यही जबाबदार असल्याचे शिवसेनेचे जि.प.सदस्य गोपाल पाटील यांनी सांगितले. मात्र यावर माजी उपाध्यक्षा नंदकिशोर महाजन यांनी हरकत घेतली. ग्रामपंचायतच्या पाणीपट्टी वसुलीशी जि.प.सदस्यांचा काय संबध? असे प्रतिप्रश्न नंदकिशोर महाजन यांनी केले. यावरून नंदकिशोर महाजन आणि गोपाल पाटील यांच्यात खडाजंगी झाली. शेवटी सदस्यांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद मिटविला.

पदाधिकाऱ्यांबद्दल बीडीओंची नाराजी

अमळनेर येथील पंचायत समिती सभापती रेखा पाटील यांनी बीडीओ मनमानी कारभार करतात अशी तक्रार सभेत केली. यावेळी बीडीओ संदीप वायर यांनी समोर येऊन सभापती यांच्या पतीला सभेत बसण्याचे अधिकार नाही असे सांगितले तसेच सभापती यांचे कार्यकर्ते सभापतींसमोर अधिकाऱ्यांचा अपमान करतात, चुकीचे काम करण्यास दमदाटी करतात अशा शब्दात आपली भावना व्यक्त केली. यावेळी संपूर्ण सभागृहाने असे बीडीओ संदीप वायर यांची बाजू घेत, सभापतींना समज दिली.

पाचोरा बीडीओंवर कारवाई करा

पाचोरा तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत सुरु असलेल्या विहिरींचे काम बंद करण्यात आले आहे. याबाबत जि.प.सदस्य मधुकर काटे, रावसाहेब पाटील यांनी तक्रार केली. चालू कामे बंद केल्याने गटविकास अधिकारी सनेर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. पाचोरा तालुक्यातील शेतकरी झेडपीला येऊन आत्मदहन करतील, त्याला रोजगार हमी योजनेचे अधिकारी जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

अध्यक्षांनी खुर्चीला न्याय दिला

जिल्हा परिषदेला महिला अध्यक्ष लाभले आहे. महिला केवळ नावाला अध्यक्ष असतात, सभा मात्र पुरुष पदाधिकारीच चालवतात असे नेहमीच असते. मात्र विद्यमान जि.प.अध्यक्षा रंजना पाटील यांनी सभा चांगलीच गाजवली. सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊन अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. त्यामुळे सभेत यापूर्वीच्या अध्यक्षा अधिक बोलत नव्हत्या. या अध्यक्षा बोलतात, त्यांनी खुर्चीला न्याय दिला अशी प्रतिक्रिया उमटत होती. सभेत महिला सदस्यांना अधिक बोलू दिले जात नसल्याची नेहमीच ओरड होती, मात्र यावेळी अध्यक्षांनी योग्य समन्वय ठेवत महिलांनाही बोलण्याची संधी दिली.

२० टक्के वसुली बंधनकारक

ग्रामीण भागासाठी राबविण्यात येणाऱ्या पाणी योजनांवर होणाऱ्या खर्चापोटी ग्रामपंचायतीतून पाणी पट्टी कर वसुली पुरेशी होत नाही. पंचायत समिती स्तरावरून दाखविण्यात येणाऱ्या वसुलीची आकडेवारी खोटी दाखविण्यात येत असते. मुळात वसुली होत नाही; यात यंत्रणा दोषी असल्याचा आरोप सदस्यांनी केला. यामुळे गटविकास अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करण्याची मागणी सदस्यांनी केली. संपुर्ण चर्चेनंतर पं.स.ने दर महिन्याला होणाऱ्या वसुलीच्या वीस टक्‍के रक्‍कम जि.प.कडे जमा करण्याचे आदेश सीईओ यांनी दिले. याची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे व ग्रा.पा.पु.च्या कार्यकारी अभियंता सुनंदा नरवाडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

छापखान्यासाठी एक कोटी तरतुद करा

जिल्हा परिषदेच्या मालकीचा छापखाना सुरू करण्याबाबतचा मुद्दा शिवसेनेचे नानाभाऊ महाजन यांनी सभेत मांडला. छापखाना सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सेस फंडात वाढ होवू शकेल. यासाठी एक कोटी रूपयांची तरतुद येणाऱ्या अर्थसंकल्पात करण्याची मागणी त्यांनी केली. यावरून उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी छापखान्यासाठी 50 लाख रूपयांची तरतुद करण्यात आल्याचे सांगितले. मात्र 50 लाखात छापखाना सुरू होवू शकणार नसून तरतुद वाढविण्याचा मुद्दा प्रभाकर सोनवणे यांनी मांडला. यास सभागृहाने सहमती दर्शविली आहे.

आरोग्य विभागाचे धिंडवडे

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे निर्लेखन झालेल्या इमारतीचे ठराव मंजुर असतांना तीन वर्षापर्यंत नविन इमारतीच्या मंजुरीचे ठराव सभेत ठेवले जात नसल्याने नानाभाऊ महाजन यांनी आक्रमक होत आरोग्य विभागाचे धिंडवडे काढले. याच विषयावरून उपाध्यक्ष लालचंद पाटील,प्रताप पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.