भाजपातील गटबाजी मुख्यमंत्र्यासमोर ?

0

जळगाव (प्रदीप चव्हाण) । जिल्ह्यात भाजपात खडसे व महाजन हे दोन गट सक्रिय असल्याचे जिल्ह्यालाच काय तर संपुर्ण राज्याला ज्ञात आहे. अनेकदा भाजपातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना वर्षभरापुर्वी अनेक आरोप झाल्याने पदाचा राजीनामा द्यावा लागला. येत्या 4 जूनला त्यांना राजीनामा देऊन एक वर्ष पुर्ण होत आहे. खडसेंना राजीनामा द्यायला पक्षांतर्गत गटबाजी देखील जबाबदार असल्याचे खडसे समर्थक मानतात. त्यामुळे खडसे समर्थक 18 में पासून सोशल मिडीयावर ब्लँक डे अभियान राबवित आहे. या अभियानात खडसे समर्थक सोशल मिडीयावर काळ्या प्रतिमा टाकत असून निषेध व्यक्त करीत आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 29 मे रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असल्याने त्यांच्या समोर खडसे समर्थक विरोध दर्शवू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यासमोर पुन्हा एकदा भाजपातील गटबाजी उघड होण्याची शक्यता आहे.

दोन भाऊंचे पुन्हा वाकयुध्द
गिरीश भाऊ व नाथाभाऊ यांनी जिल्ह्यात पक्ष उभारणीसाठी मोठे प्रयत्न केले आहे. जिल्ह्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आज भाजपाची ओळख आहे. मात्र काही दिवसांपासून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने ते दोन्ही भाऊ संधी साधून एकमेंकाचे चिमटे घेतात. नुकतेच खडसेंचे नाव न घेता महाजनांनी ’सगळे माझ्यामुळेच झाले, असे म्हणण्याचे दिवस गेले,’ अशा शब्दात कानपिचक्या घेतल्या तर खडसेंनी महाजन यांचे नाव न घेता ’आपण राजकारणात अनेकांना नाड्या बांधायला शिकविले’. अशा शब्दात पलटवार केले. यातुन दोन्ही भाऊंमध्ये पुन्हा वाकयुध्द सुरु झाल्याचे दिसते.

मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी का?
जिल्ह्यात पक्ष उभारणीसाठी खडसे व महाजनांची भरीव कामगिरी आहे. दोघांमध्ये मतभेद असणे हे पक्षांसाठी भविष्यात तोट्याचे ठरु शकते. नुकतेच संरक्षणराज्यमंत्री सुभाष भामरे व आमदार अनिल गोटे यांना एकत्रीत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धुळे येथे सभा घेतली. मात्र खडसे व महाजनाबाबतीच वेगळा न्याय का? असा सुर कार्यकर्त्यांमधुन उमटत आहे. मुख्यमंत्र्यांनी खडसे व महाजनांना एकत्रीत आणण्यासाठी मध्यस्थिची भुमिका घेणे गरजेचे आहे.

मागील वर्षाची पुनरावृत्ती
मागील वर्षी जामनेर येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली समाधान शिबीराअंतर्गत वेगवेगळ्या प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्व नेते या कार्यक्रमास हजर होते मात्र खडसेसह समर्थक अनुपस्थित होते. खडसेंनी मुख्यमंत्र्यांची विमानतळावर भेट घेऊन बंदद्वार चर्चा केली होती. यावेळी देखील खडसे मुख्यमंत्र्यासमोर आपली व्यथा मांडणार का? हे येणार्‍या काळात दिसेल.

सोशल मिडीयातील चर्चा
भोसरी भुखंड व दाऊस संभाषण आरोप प्रकरणी खडसेंनी राजीनामा दिला. खडसेंची चौकशी 3 महिन्यात पुर्ण होईल असे सुरुवाती पासून सांगण्यात येत आहे परंतु वर्ष होत आले असतांना सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे निष्पन्न झाले असतांना देखील सरकार गप्प असून निकालाची प्रक्रिया लांबवतांना दिसत आहे. अशी चर्चा सोशल मिडीयावर खडसे समर्थक करीत आहेत.