भाजपातील भाऊबंदकी पुन्हा चव्हाट्यावर

0

जळगाव।  भाजपमधील दोन्ही गटांमधल्या संघर्षाचा नवीन अध्याय शनिवारी आयोजित पक्षाच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात दिसून आला. आ. एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांनी त्यांचा मंत्रीमंडळात समावेश करावा यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याने मेळाव्यात गोंधळ उडाला. दोन्हीकडच्या नेत्यांनी भाषणांमधून एकमेकांना टोमणे मारले. तर खडसे हे भाषण आटोपून निघून गेल्यावर त्यांच्या समर्थकांनीही काढता पाय घेतल्यामुळे गटबाजीचा संघर्ष नवीन टप्प्यावर आल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

मेळाव्यात झाला गोंधळ
शहरातील एमआयडीसी परिसरातल्या बालाजी लॉन येथे भाजप कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी महसूलमंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे समर्थकांनी खडसे यांच्यावर अन्याय झाला असून कोणतेही आरोप सिध्द झालेले नसतांनाही त्यांना मंत्रीपदापासून वंचीत ठेवण्यात आल्याची भावना व्यक्त केली तसेच खडसेंना पुन्हा मंत्रीमंडळात घ्यावे या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. माजी जिल्हाध्यक्ष डॉ. बी.एस.पाटील यांनी खडसे समर्थकांना थेट आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा सल्ला दिल्यामुळे हा वाद चिघळला. यानंतर आ. खडसे यांनी भाषण आटोपताच तेथून जाणे पसंत केले. तर त्यांच्या समर्थकांनीही लागलीच काढता पाय घेतला.