भाजपात गट-तट हे मिडीयाने रंगवलेले चित्र

0

माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे ; भुसावळ शहरातील विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री निश्‍चितच येणार

नाथाभाऊ उवाच ; मी सर्वांना आवडणारा नेता असल्याने विरोधकांकडून स्तुतीसुमने ; अडीच वर्षात अन्याय झाला मात्र पक्षाच्या पदाधिकार्‍यांपुढेच बोललो

भुसावळ- भाजपात कुठलेही गट-तट नसून हे मिडीयाने रंगवलेले चित्र आहे, मी सर्वांनाच आवडणारा नेता असल्याने विरोधक आपल्यावर स्तुतीसुमने उधळतात व मी देखील त्यांच्याविषयी चांगलेत बोलतो, असे सांगत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अडीच वर्षांपासून पक्षाकडून अन्याय होत असलातरी पक्षापुढेच आपण नाराजी व्यक्त केली असल्याचे स्पष्टोक्ती येथे दिली. शांती नगरातील प्रा.सुनील नेवे यांच्या ‘अटल’ निवासस्थानी मंगळवारी सकाळी त्यांनी मुख्यमंत्री दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांचा 21 तारखेचा दौरा हा निश्‍चित असून विकासकामांच्या उद्घाटनासाठी ते निश्‍चित येतील, असा दावाही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना केला.

खासदारांचा लेखाजोखा जनतेपुढे मांडणार -खडसे
माजी मंत्री खडसे म्हणाले की, खासदारांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा जनतेपुढे मांडण्याची भाजपाची परंपरा आहे. कै.रामभाऊ म्हाळगे यांनी तशी सुरुवातच केली होती त्यामुळे रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांनी मतदारसंघात नेमकी काय-काय कामे केली याचा लेखाजोखा अहवाल प्रकाशनाद्वारे मांडला जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डी.एस.ग्राऊंडवर 21 रोजी सकाळी 11 वाजता त्याचे प्रकाशन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत सर्वात जास्त निधी भुसावळ पालिकेला दिला असून या माध्यमातून शहरातील विविध विकासकामे तसेच रस्त्यांची कामे केली जाणार आहे. भुसावळ शहरातील शवविच्छेदनाचा प्रश्‍न मार्गी लागणार असून त्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा झाली असून प्रस्ताव देण्याचे त्यांनी सूचवले आहे तर लवकरच पालिका दवाखान्यात एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती होणार असल्याचे खडसे म्हणाले. भुसावळ शहरात 21 रोजी मेहतर समाजाचा राज्यस्तरीय मेळावा होणार असून त्यासदेखील मुख्यमंत्री हजेरी लावणार असल्याचे खडसे म्हणाले.

बेघरांना मिळणार हक्काचे घर
खडसे म्हणाले की, रेल्वेने काढलेल्या अतिक्रमणात सुमारे 850 झोपडपट्टीधारक बेघर झाले मात्र सुमारे साडेतीन हजारांवर नागरीकांकडे हक्काचे घर नाही, अशा नागरीकांसाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम हाऊसिंग कार्पोरेशनच्या माध्यमातून हक्काची घरे दिली जाणार आहे त्यासाठी पालिका भूले भूखंड व गायरान जमीन हस्तांतराणाची प्रकिरणा लवकरच पार पडत असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास 21 रोजी मुख्यमंत्री त्याबाबत अधिकृत घोषणा करतील, असेही खडसे म्हणाले. या प्रश्‍नासंदर्भात हाऊसिंग मंडळाचे अध्यक्ष मिरगणे यांच्याशी चर्चा झाली असून मुंबईत बैठकही घेण्यात आल्याचे ते म्हणाले. खासदार खडसे यांच्या प्रयत्नाने 16 फेब्रुवारीपासून भुसावळ-बांद्रा व्हाया नंदुरबार गाडी सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

शहर विकासाचा शब्द पाळला -खडसे
निवडणुकीत भुसावळ शहर विकासाचा शहरवासीयांना शब्द दिला होता तो आम्ही पाळल्याचे खडसे यांनी सांगत अटल योजनेच्या माध्यमातून शहराचा पाणीप्रश्‍न निकाली निघाला असून भुयारी गटारींसाठी मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याची सकारात्मकता दर्शवल्याचे ते म्हणाले. शहरात सात वर्ष गॅरंटीचे एलईडी दिवे बसवण्यात आले असून स्वच्छतेचा प्रश्‍नही मार्गी लावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पाच उद्यानांचे उद्घाटन -रमण भोळे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहरातील पाच नव्याने निर्मित उद्यानांचे उद्घाटन करण्यात येणार असून सर्वात मोठ्या सोमानी गार्डनजवळ दहा एकर क्षेत्रावर अडीच कोटी रुपये खर्चून उद्यानाचे काम सुरू असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली. शहराचा समतोल पद्धत्तीने विकास केला जात असून हनुमान नगरासह विकास कॉलनी, गडकरी नगर, गणेश कॉलनी भागात उद्यानांची निर्मिती सुरू असल्याचे नगराध्यक्ष भोळे म्हणाले.

यांची होती उपस्थिती
पत्रकार परीषदेला नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, गटनेता मुन्ना तेली, नगरसेवक अ‍ॅड.बोधराज चौधरी, पिंटू कोठारी, किरण कोलते, महेंद्रसिंग ठाकूर, मुकेश पाटील, प्रमोद सावकारे, गिरीश महाजन, देवा वाणी, रमेश मकासरे, पवन बुंदेले, रमाशंकर दुबे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, सुमित बर्‍हाटे, प्रशांत पाटील, व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.