भाजपात प्रवेश करण्याच्या निर्णयावर आमदार शिरीष चौधरींनी दिली ही माहिती

MLA Shirish Choudhary presented this position regarding his decision to join BJP जळगाव : सत्तेसाठी व फायद्यासाठी गद्दारी करण्याची भूमिका माझ्या रक्तात नाही. खोट्या अफवा खपवून घेतल्या जाणार असतील, तर काम कसे करायचे? असा प्रश्न उपस्थित करीत रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी भाजपात प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. जळगावात काँग्रेसची आढावा बैठक झाली. याप्रसंगी ते बोलत होते.

अफवा पसरवणारे स्वकीयच
आमदार चौधरी म्हणाले की, आक्रोश तपासून अन्याय दूर करा अन्यथा त्यांना दूर करा किंवा आम्हाला सांगा. त्यांच्याकडे आम्ही निश्चितपणे बघू. कुणाचेही नाव घेता ही अफवा कोण पसरवत आहे हेही मला माहित असल्याचे आमदार चौधरी यांनी सांगितले.

भाजपाकडून होती ऑफर
पक्षासाठी काम करणार्‍यांचे काही जणांकडून खच्चीकरण केले जात आहे. यावर पक्षाच्या नेतृत्त्वाने भूमिका घ्यावी. 2019 मध्ये भाजपाकडून तिकीट व मंत्री पदाची ऑफर होती मात्र काँग्रेसने आपल्याला भरभरून दिले आहे. पक्षाने मान-सन्मान ठेवावा. नको त्या लोकांना डोक्यावर घेऊन किती दिवस नाचणार?, अशा शब्दांत आमदार चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली.

गटबाजीत इंटरेस्ट नाही : विनायकदेशमुख
जळगावात रीझल्ट मिळण्यासाठी वरिष्ठांकडे स्वातंत्र्य मागितले होते. जिल्ह्यातील गटबाजीमध्ये मला इंटरेस्ट नाही. कुणाचीही बाजू घ्यायला आलेलो नाही आणि कुणाच्या विरोधातही नाही, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा जळगावचे प्रभारी विनायक देशमुख यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आढावा बैठकीत फटकारले.

सेना-भाजपातील फूट ही काँग्रेससाठी जमेची बाजू
देशमुख म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात काँग्रेसचा एक खासदार व चार ते पाच आमदार निवडून आणू. शिवसेना व भाजपात फूट पडली आहे. पण काँग्रेस एकसंघ आहे. ही काँग्रेससाठी जमेची बाजू आहे. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी जळगाव शहरात पुढचा आमदार काँग्रेसचा असेल. इतरही जागा आपण मिळवू. त्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.