भाजपात मी पणा व घराणेशाहीला थारा नाही : माजी मंत्री गिरीश महाजनांचा खडसेंचे नाव न घेता टोला

बोदवड नगरपंचायत निवडणूक भाजपा लढणार ः कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन

बोदवड : भाजपात मी पणा व घराणेशाही चालत नाही शिवाय पक्ष हा कुणाच्या भरवशावर चालत नाही, असा टोला माजी मंत्री खडसे यांचे नाव न घेता माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे लगावला. ते म्हणाले की, पक्षाने आपल्यावर जबाबदारी टाकल्यानंतर धुळ्यात 75 पैकी 50 नगरसेवक निवडून आणले तर नाशिकला 42 तसेच जळगावला 57 तसेच नगर येथे एका रात्रीतून परीवर्तन घडवले. हे माझ्या एकट्याचे यश नसून त्यामागे राबवणार्‍या कार्यकर्त्यांसह पक्षाचे हे यश आहे. जामनेर मतदारसंघातून मी सहा वेळा निवडून आलो असलोतरी कार्यकर्ते व विकासकामांच्या भरवशावर मी निवडून आला आहे. मंत्री असताना असताना बोदवड परीसर जलसिंचनासाठी पाचशे कोटी दिले होते हे सरकार निष्क्रीय असून कोणतीही विकासकामे या सरकारने केलेली नाहीत.

बोदवडमध्ये भाजपा स्वबळावर लढणार
बोदवड येथील नगरपंचायत निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार असून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे शिवाय पक्षापेक्षा कुणीही मोठा नसून कुणाच्या आल्याने व गेल्याने पक्षाला फरक पडत नाही, असे सूचक विधान माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. बोदवड तालुक्यातील येथे भारतात जनता पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी खासदार रक्षा खडसे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नंदू महाजन, जिल्हा कोषाध्यक्ष अनिल खंडेलवाल, ज्येष्ठ नागरीक संघाचे जिल्हाध्यक्ष अनंत कुळकर्णी, तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, सरचिटणीस अमोल देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र आहुजा यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन उमेश गुरव तर आभार अमोल देशमुख यांनी मानले.