भाजपात वाल्याचा वाल्मिकी होतो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

0

पिंपरी-चिंचवड। भाजपामध्ये वाल्याचा वाल्मिकी होतो म्हणून आम्ही गुन्हेगारांना पक्षात घेतले असे प्रतिपादन करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षात आयात केलेल्या नेत्यांचे समर्थन केले. नव्या लोकांना सामावून घेतलं नाही, तर पक्षाचा विस्तार कसा होणार? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. ते येथे आजपासून भाजपच्या सुरू झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते.

विविध विषयांवर मंथन
सकाळी कासारवाडी येथील हॉटेल कलासागर येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह माजी मंत्री एकनाथराव खडसे व प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. गडकरींनी घेतलेल्या बैठकीत प्रसारमाध्यमांना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले होते. बैठकीच्या सुरुवातीला पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, महापौर नितीन काळजे, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचे स्वागत केले. तब्बल 33 वर्षानंतर उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये बैठक होत असल्याने संपूर्ण शहर भाजपमय झाले होते.

ठामपणे समर्थन
भारतीय जनता पक्षात लोकसभा निवडणुकीपासूनच मोठ्या प्रमाणात अन्य पक्षांमधील नेते दाखल झाले आहेत. अगदी अलीकडेच झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आयात करण्यात आलेल्या उमेदवारांमुळे भाजपचा विजय झाल्याचा आरोप करण्यात येत होता. या पार्श्‍वभूमिवर गडकरींनी पहिल्यांदा ठामपणे याचे समर्थन केले. कुणाची पार्श्वभूमीवर काय आहे यावर सर्वकाही अवलंबून नाही तर आमच्यासोबत आल्यानंतर तुम्ही कसे वागता हे महत्त्वाचे आहे. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो हे लक्षात ठेवा असे गडकरी यांनी म्हटले. दिल्लीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाबदद्ल त्यांनी आनंद व्यक्त केला.

नेत्यांची उपस्थिती
राज्यात शेतीविषयक निर्माण झालेल्या समस्या, शेतकरी कर्जमाफी आणि या प्रश्‍नांवरून विरोधकांनी पेटविलेले रान या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे पक्षसूत्राने सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत भाजपने चांगली कामगिरी केली आहे. या विजयाबद्दलही या बैठकीत चर्चा करण्यात आली. मंत्रिमंडळाचा विस्तार, शेतकर्‍यांना कर्जमाफी, शिवसेनेसोबतचे राजकीय संबंध आणि विरोधकांच्या संघर्षयात्रेला प्रत्युतर देण्यासाठीची रणनीती आदी मुद्दे या बैठकीत प्रामुख्याने चर्चिले जाणार असल्याचेही सूत्र म्हणाले. पक्षाचे पदाधिकारी, आमदार, जिल्हाध्यक्ष, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री यांच्यासह पक्षाचे कार्यालयप्रमुख अशा 800च्या आसपास नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली आहे.