गांधीनगर: भाजपचे शक्तिशाली नेते राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल गांधीनगरमधून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली. यात त्यांची संपत्ती गेल्या सात वर्षात तीनपट वाढली असल्याचे दिसून आले. राज्यसभा सदस्य म्हणून मिळणारे मानधन, घरभाडे आणि शेती हीच मिळकतीची साधने असल्याचेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
अमित शहा आणि त्यांच्या पत्नीची एकूण संपत्ती ३८.८१ कोटी आहे. २०१२ मध्ये त्यांची संपत्ती ११.७९ कोटी होती. त्यात त्यांना वारसा हक्काने मिळालेल्या २३.४५ कोटी संपत्तीचाही समावेश आहे. शहा पती-पत्नीच्या बचत खात्यात २७.८० लाख रुपये आहे. त्याशिवाय ९.८० लाख रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिटही त्यांच्या नावावर आहे.
चारचाकी वाहन नाही
शहा यांच्याकडे एकूण २० हजार ६३३ रुपये आणि त्यांच्या पत्नीकडे ७२ हजार ५७८ रुपये रोख रक्कम असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. २०१७ पासून ते आतापर्यंत त्यांच्या संपत्तीत ४.५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. शहा यांनी त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीकडे स्वत:चे एकही चारचाकी वाहन नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे त्यांच्याविरोधात चार गुन्हे दाखल असून त्यापैकी दोन बिहारमध्ये आणि दोन पश्चिम बंगालमध्ये दाखल असल्याचंही प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.