भाजपानेच तालुक्यास न्याय देऊन पुसले अश्रू!

0

अमळनेर । तालुक्यात दुष्काळग्रस्त स्थिती असताना तालुक्याची आणेवारी कमी होऊन दुष्काळ जाहीर व्हावा, यासाठी आमदार स्मिता वाघ यांनी सतत प्रयत्न केले होते. यासाठी अनेक भाजपा नेत्यांनी सहकार्य देखील केले शेवटी मुख्यमंत्री, पालकमंत्री, ना. गिरीष महाजन व आ. एकनाथराव खडसे हि सर्व मंडळी भाजपाचीच असून भाजपने या तालुक्यास न्याय देऊन नैसर्गिक आपत्तीत जनतेची अश्रू पुसली, असे म्हणायला हरकत नाही. यामुळे विरोधकांनी दुसर्‍याच्या कड्यावरचे बाळ पाहून उगाच आनंदित व्हायची आवश्यकता नाही, असा टोला अमळनेर भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जीवन पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये लगावला आहे.

भाजपा तालुकाध्यक्षांचा विरोधकांना टोला
अमळनेर तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षांची तोंडे बंद झाल्याने विरोधी पक्षाच्या एका स्थानिक पदाधिकार्‍यांने आमदार स्मिता वाघ यांनी कोणताही पाठपुरावा केला नसून हे आमदार नाथाभाऊ यांचे श्रेय असल्याचा दावा करून त्यांचे जाहीर आभार व्यक्त केले होते. मात्र काहीही असो या निमित्ताने का असेना विरोधक देखील आता भाजपा व नेत्यांचे गोडवे व कौतुक करायला लागलेत हेच यातून सिद्ध होत असून त्यांच्या पक्षाचे हे अपयशच आहे. प्रत्यक्षात ज्या वेळी स्थानिक प्रांत व तहसीलदारांच्या दुर्लक्षामुळे अमळनेर तालुक्याची आणेवारी जास्त लागली. त्यावेळी आमदार स्मिता वाघ यांनी प्रांत व तहसीलदारांना तालुक्याची दुष्काळग्रस्त परिस्थिती व अनेक गावांत सुरु असलेले पाणी टँकर दिसत नसल्याने या दोन्ही अधिकार्‍यांचे चष्मे बदलावविण्याची गरज आहे अशी खंत वृत्तपत्राद्वारे व्यक्त केली होती एवढेच नव्हे तर त्यांनी लागलीच तालुक्याची विस्तृत माहिती घेऊन जिल्हाधिकार्‍यांशी प्रत्यक्ष बैठक लावली अनेक अधकार्‍यांच्याही त्यांनी बैठका घेतल्या यामुळे जिल्हास्तरावर हालचाली सूरु झाल्या.