वरणगाव : भुसावळवरून वरणगावात येण्या-जाण्यासाठी फुलगावजवळील रेल्वे गेटवरूनच सध्या वाहने सुरू होती मात्र डी.आर.एम.यांच्या आदेशाने सेक्शन इंजनियर सुबोध कुमार यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता फुलगाव रेल्वे गेट बंद करताच वाहतूक ठप्प झाली. गेट बंद झाल्याने सर्व बसेस, रुग्णवाहिका, ट्रक जागेवरच थांबले. याची माहिती कळताच भाजपा पदाधिकार्यांनी धाव घेतली. माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी महामार्गावरील वाहतूक बंद करू, असा इशारा नहींचे प्रकल्प संचालक सिन्हा यांना दिल्यानंतर सिन्हा यांनी तत्काळ रेल्वे विभागाला रेल्वे गेट उघडण्यासाठी पत्र दिल्यानंतर तीन तासांनी गेट उघडल्याने वाहतूक सुरळीत झाली.
यांची होती उपस्थिती
रेल्वे गेट बंद झाल्यानंतर माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई, मिलिंद भैसे, फुलगावचे भाजपा नेते राजकुमार चौधरी, भाजयुमोचे सिद्धांत राजेंद्र चौधरी, माजी सरपंच शेख सईद यांनी धाव घेतली. दरम्यान, माजी मंत्री आमदार संजय सावकारे व खासदार रक्षा खडसे यांनी डी.आर.एम यांच्याशी फुलगाव रेल्वे गेट सुरू ठेवण्याबाबत चर्चा केली. गेट बंद झाल्याने बसेससह रुग्णवाहिका यांना पाच किलोमीटर फेर्याने जावे लागणार होते मात्र गेट सुरू झाल्याने आता गैरसोय दूर झाली आहे.
गेट उघडण्याच्या सूचना : आमदार
आमदार संजय सावकारे म्हणाले की, डीआरएम व नहींच्या अधिकार्यांना गेट उघडण्याच्या सूचना केल्या तसेच वास्तविकता निदर्शनास आणली.