भाजपाने जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची अभद्र युती तोडावी

0

शिवसैनिकांनी वाचला भाजपाच्या अन्यायाचा पाढा

जळगाव – जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मंत्री ना. गिरीश महाजन यांनी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करून आणि सदस्यांना अपात्र करून अन्याय केला आहे. हा अन्याय विसरता येण्यासारखा नाही. तसेच औरंगाबादला ज्याप्रमाणे खा. चंद्रकांत खैरे यांनी भाजपाला सत्तेत सहभागी करून घेतले त्याच धर्तीवर भाजपाने जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची अभद्र युती तोडुन महापालिकेत उपमहापौर पद द्यावे आणि शिवसैनिकांना सन्मानजनक वागणुक मिळावी तेव्हाच शिवसैनिक निवडणुकीत भाजपाचे काम करेल असा ईशारा आज जळगाव लोकसभेतील शिवसैनिकांनी जिल्हा बैठकितुन दिला.
जळगाव लोकसभा मतदारसंघाची शिवसेनेची जिल्हा बैठक सरदार पटेल सभागृहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख डॉ. संजय सावंत, सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी आ. चिमणराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा संघटक ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, नगरसेवक विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, मंगला बारी, शोभा चौधरी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक
जळगाव लोकसभेच्या बैठकित शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांनी भाजपाविरूध्द आज उघड आक्रमक भूमिका घेत अन्यायाचा पाढाच वाचला. भाजपाकडुन गेल्या साडेचार वर्षात कशापध्दतीने शिवसैनिकांचा छळ केला गेला हे तालुकाप्रमुखांनी पोटतिडकीने मांडले. एरंडोल तालुकाप्रमुक प्रा. वासुदेव पाटील यांनी सांगितलेकी, तालुक्यात ३ पैकी २ जि.प.सदस्य सेनेचे आहेत आणि एक भाजपाचा. नगरपालिकेत भाजपाने राष्ट्रवादीशी आघाडी करून सत्ता मिळविली आहे. एकाही समितीवर शिवसेनेचा पदाधिकारी नाही मग कशासाठी काम करायचे ? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. पारोळा तालुकाप्रमुख प्रा. आर.बी.पाटील यांनी सांगितले की, जळगाव लोकसभा क्षेत्रात १२ जिल्हा परीषद सदस्य शिवसेनेचे आहेत. ज्याप्रमाणे राज्य आणि केंद्रीय निवडणुकांसाठी युती केली जाते त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपाने शिवसेनेसोबत युती करावी, एकतर्फी प्रेम काही कामाचे नसल्याचे त्यांनी सांगितले. पाचोरा तालुकाप्रमुख अरूण पाटील यांनी शिवसैनिकांवर झालेल्या अन्यायासंदर्भात बोलतांना सांगितले की, भाजपाचे मंत्री ना. गिरीश महाजन यांनी आमच्यावर ३५३ चे गुन्हे दाखल केले. कुर्‍हाडचे सात सदस्य अपात्र करून ग्रामपंचायतीवर प्रशासक बसविण्यासाठी पाठपुरावा केला. असे असतांना भाजपाचे काम आम्ही करणार नाही असा ठराव पाचोरा येथील शिवसैनिकांनी केला असल्याचे अरूण पाटील यांनी सांगितले. भडगावचे गणेश परदेशी यांनी सांगितले की, पाणीपुरवठा मंजूर होऊ नये म्हणुन खुद्द जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी खोडा घातला. निव्वळ आ. किशोर पाटील यांचे नाव होऊ नये म्हणुन महाजनांनी पाण्यातही राजकारण केले. पाच वर्ष झालेल्या अन्यायाचा पाढा पाच मिनीटात मांडणार कसा? असा सवाल त्यांनी शिवसेना नेत्यांना विचारला. पाचोरा येथील अ‍ॅड. देवरे यांनी सांगितले की, शिवसेनेचे नगरसेवक गोहील आणि बाजार समितीचे संचालक अपात्र करण्यासाठी भाजपाचे मंत्री ना. गिरीश महाजन यांनी राजकीय दबाव आणल्याचे सांगितले. आधी भाजपा आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची समन्वय बैठक घेऊन शिवसैनिकांना न्याय मिळवुन द्यावा अशी मागणी त्यांनी केली. जळगाव तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टी ही धोकेबाज असल्याचा आरोप केला. तसेच चाळीसगावचे महेंद्र पाटील, धरणगावचे पी.एम.पाटील यांनीही भाजपाविरोधात आगपाखड केली.

जिल्हा परिषदेतील अभद्र युती तोडा – रावसाहेब पाटील
राज्यात आणि केंद्रात युती झाली असतांना जिल्हा परिषदेत मात्र भाजपाने काँग्रेससोबत अभद्र युती केली आहे. औरंगाबादच्या धर्तीवर भाजपाने काँग्रेससोबतची युती आधी तोडावी आणि शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घ्यावे अन्यथा भाजपाचे काम करणार नाही असे जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी सांगितले.

महापालिकेत उपमहापौर पद द्या- विष्णू भंगाळे
महापालिका निवडणुकीत भाजपाने कशापध्दतीने शिवसेनेचा घात केला हे संपुर्ण जिल्ह्याने बघीतले आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेचे आज १५ नगरसेवक निवडुन आले आहे. मात्र हे १५ नगरसेवक ६० जणांना भारी पडत आहे. भाजपाचे आमदार राजूमामा भोळे आणि महापौर सीमा भोळे हे शिवसेनेचा नगरसेवक असलेल्या वॉर्डात विकासकामांसाठी निधी देत नसल्याचा आरोप नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी केला. दरम्यान युतीधर्म पाळायचा असेल तर महापालिकेत शिवसेनेला उपमहापौरपद द्यावे अशी मागणीही भंगाळे यांनी केली.

उमेदवारावरून भाजपातच दोन गट- गुलाबराव वाघ
जळगाव लोकसभेच्या उमेदवारीवरून भाजपामध्येच दोन गट पडले आहे. गुलाबराव देवकरांची भूत हे भाजपाने वाढविले असल्याचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भाजपाने जळगाव ग्रामीण मतदारसंघात कधीच शिवसेनेला मतदान केले नाही. मात्र जळगाव लोकसभेचा उमेदवार शिवसेनेच्या मदतीशिवाय निवडुन येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जोपर्यंत भाजपा जिल्हा परिषदेतील अभद्र युती तोडत नाही तोपर्यंत काम करणार नाही असेही गुलाबराव वाघ यांनी सांगितले.

आपल्यातील गडबड मिटवा – चिमणराव पाटील
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रीय पातळीचा विचार करूनच युतीचा निर्णय घेतला आहे. पक्षप्रमुखांचा निर्णय हा शिवसैनिकांसाठी अंतीम असतो. शिवसेनेला विधानसभेच्या निम्म्या जागा मिळाल्या हेच पक्षप्रमुखांचे यश आहे. लोकसभा निवडणुकीतच विधानसभेची पेरणी करावी लागणार आहे. त्यासाठी आधी आपल्यातील गडबड मिटवा असे आवाहन माजी आ. चिमणराव पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेतील युती निवडणुकीपुर्वी जाहीर करा- ना. गुलाबराव पाटील
मी गुलाबराव देवकरांना मदत केली तर माझी आमदारकी बिनविरोध होईल अशी सध्या चर्चा सुरू आहे. पण गेल्या साडेचार वर्षापासुन मी लढण्याची तयारी करीत आहे. आमच्यावर भाजपाच्या लोकांचे अधिक लक्ष आहे. अन्याय माझ्यावरही झाला. माझी आई वारली तेव्हा मी जेलमध्ये होता हे जिल्ह्याने बघीतले आहे. पण रडुन चालणार नाही. ते नवरीवाले आणि आपण नवरदेववाले आहोत. मंत्री असल्याची या सरकारमध्ये कधीही समाधान झाले नाही. भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्याबाबत भाजपामध्ये मोठी नाराजी आहे. असे असले तरी आम्ही फरफटत जाणार नाही. बिना निवत्याचे पंगतीला जाणार नाही असा इशारा सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भाजपाला दिला. तसेच जळगाव लोकसभेची फाइट टफ आहे. शिवसेनेशिवाय भाजपाची सीट निवडून येऊ शकत नाही. मनपा निवडणुकीत हवालदारापासून यंत्रणा भाजपाच्या ताब्यात होती. मात्र आता जिल्हा परिषदेतील युती निवडणुकीपुर्वी जाहीर करावी असेही ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.