मारहाणीचे पडसाद : भाजपामधील खुशाल जोशींसह प्रवीण इखणकर व रमाशंकर दुबे यांची पत्रकाद्वारे माहिती : भुसावळ पालिका पोटनिवडणुकीतून पक्षाने घ्यावा धडा : भाजपातील आजी-माजी पदाधिकारी पाठिमागे असल्याचा पदाधिकार्यांचा दावा
भुसावळ : जळगावात शुक्रवारी झालेल्या भाजपा जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांना काही कार्यकर्त्यांनी माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमक्ष मारहाण केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या मारहाणीला भुसावळ शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छूक व स्पर्धेत नसलेल्यांना प्रा.नेवे यांच्या सांगण्यानुसार संधी मिळाल्याचे कारण होते. या घटनेनंतर दुसर्या दिवशी भाजपातील खुशाल जोशी, प्रवीण इखणकर व रमाशंकर दुबे यांनी प्रसिद्धीपत्रक काढत भाजपातील काही गढूळ माणसांमुळे पक्षाची हानी होत असल्याची टिका केली आहे. या टिकेमुळे भुसावळ भाजपातील राजकारण ऐन थंडितही तापले आहे.
दोन नंबरचे धंदे नाही वा कंत्राटदारही नाही
खुशाल जोशी यांच्या म्हणण्यानुसार, ते कंत्राटदार नाही वा त्यांचे दोन नंबरचे धंदेदेखील नाहीत. आपल्या रूपाने तिसरी पिढी भाजपात कार्यरत असून कुटुंबाने कधीही कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही. भुसावळ भाजपा ही खाजगी कंपनी बनत असल्याने व व्यक्ती केंद्रीत पार्टी होण्यापासून वाचायला हवी, अशी आपली इच्छा आहे. जळगावात माजी प्रदेशाध्यक्षांना निवेदन दिल्यानंतर झालेल्या गोंधळात शाई कुणी फेकली वा मारहाण केली आपल्याला माहिती नाही शिवाय मारहाण करण्याचे संस्कार आमच्यावर नाहीत. पक्ष खाजगी कंपनी केला जात असल्याने आपण विरोध केल्यानेच प्रा.नेवे आपल्यावर आरोप करीत असल्याचे ते म्हणाले. घडल्या प्रकाराची चौकशी होईस्तोवर प्रा.नेवे यांना कुठलेही पद देवू नये, अशी आपली मागणी असल्याचेही जोशी कळवतात.
पक्ष ध्येय धोरणाला विरोध करणारा गटनेता
भाजपाचे गटनेता मुन्ना तेली यांना अपक्ष असतानाही पद देण्यात आल्याचा आपण विरोध करीत नाही मात्र केंद्र सरकारच्या कायद्याविरूद्ध भाजपा गटनेता मुन्ना तेली हे मोर्चात आघाडीवर राहिले त्यामुळे त्यांच्याबाबत माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना निवेदन दिले. पक्षाच्या वरीष्ठ पातळीवर तक्रार करण्याचा नियम जसा आहे तसा कार्यकर्ता म्हणून आपल्याला अधिकार असल्याचे जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे. मुन्ना तेली यांच्यासह पक्षातही काही गढूळ माणसांमुळे पक्षाची हानी होत असल्याने ती यापुढे होणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत.
आजी-माजी पदाधिकारी पाठिशी
खुशाल जोशी यांच्या पत्रकानुसार भाजपाला खाजगी कंपनी करण्यास विरोध केल्याने आजी-माजी पदाधिकार्यांसह कार्यकर्ता व जनतेचा आपल्याला पाठिंबा आहे व जिल्ह्यातूनही पाठिंबा मिळत आहे. भुसावळ भाजपातील एकाधिकारशाही पाहून दुखी असून भविष्यातसुद्धा अशा प्रवृत्तींना विरोध राहणार असून भुसावळात भाजपा वाढीसाठी प्रयत्न राहणार आहे.