भाजपाला लक्ष्मण जगतापच आधार

0

पिंपरी-चिंचवड (बापू जगदाळे) : राज्यात भाजप व शिवसेना यांच्यात ताणलेले संबंध पाहता मुदतपुर्व निवडणुका होण्याची शक्यता सर्वच पक्षांनी गृहीत धरली आहे. त्यामुळे पक्षांबरोबरच इच्छुकही तयारीला लागले आहेत. हीच परिस्थिती राज्याबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरातही आहे. मोदी लाटेनंतर शहरातील परिस्थिती भाजपाकडे झुकलेली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपाने मुसंडी मारत महापालिकेवर कमळ फुलवले आहे. यामध्ये चिंचवडचे आमदार व पक्षाचे शहर अध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचा मोलाचा वाटा आहे. मागील वेळेप्रमाणे जगताप पुन्हा एकदा खासदारकी लढविण्यासाठी इच्छुक आहेत, असे बोलले जाते. पण लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या गेल्यास चिंचवडमधून भाजपाकडे प्रबळ असा उमेदवार नाही. तर हीच परिस्थिती राष्ट्रवादी व शिवसेनेचीही आहे.

जिल्हयात सर्वाधिक मतदार असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणून हा ओळखला जातो. 2009 साली हवेली मतदार संघाची पुनर्ररचनामध्ये अस्तित्वात आलेल्या या मतदार संघाचे सलग दोनवेळदोन्ही वेळेस लक्ष्मण जगताप यांनी नेतृत्व केले आहे. त्यांची पकड या मतदार संघावर घट्ट आहे. त्या भरवशावरच त्यांनी लोकसभेची देखील निवडणूक लढवली होती. तर आता देखील पुन्हा लोकसभेसाठी ते इच्छुक आहेत. तर राज्याच्या नियोजीत मंत्रीमंडळ विस्तारामध्ये त्यांना मंत्रीपद मिळेल अशी चर्चा आहे. पण जर लोकसभा निवडणुकीपर्यत युती कायम राहिली तर विधानसभेची निवडणूकदेखील लोकसभेबरोबरच होणार हे जवळपास निश्‍चित आहे.

जगताप लढणार की नाही यावर विरोधकांची गणिते
चिंचववड विधानसभा मतदारसंघ हा खरं तर जगताप यांचा, पर्यायाने आता भाजपाचा बालेकिल्ला झाला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी व शिवसेनेकडे तेवढा सक्षम उमेदवार नाही, ही वस्तुस्तिथी आहे. जगताप लोकसभा की विधानसभा यातील कोणता पर्याय निवडतात यावरच विरोधकांची विधानसभेच्या विजयाची गणिते अवलंबून आहेत. जर त्यांनी लोकसभेचा पर्याय निवडला, तर भाजपाकडे त्यांच्या तोडीचा एकही उमेदवार नाही. मात्र, जुन्या भाजपाच्या कार्यकर्त्याला येथून संधी मिळू शकते व कदाचित त्यांची ताकदही त्यांच्यामागे उभी राहील. जगताप यांना मागील निवडणुकीत आलेला अनुभव पाहता ते पुन्हा लोकसभा लढतील असे दिसत नाही. मागील वेळी जगताप यांच्याबरोबर राहिलेला शेकाप यावेळेस राष्ट्रवादी-कॉग्रेस आघाडीबरोबर राहण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे जर पुन्हा जगताप विधानसभेसाठी उभे राहिल्यास विरोधकांना विजयासाठी मोठा अडसर ठऱेल.

सेनेचे आव्हान; पण बारणे-कलाटे वाद अडसर
भाजपाला चिंचवड मतदारसंघात शिवसेनाच तगडे आव्हान उभे करु शकते; पण शिवसेनेतील अंतर्गत कलह त्यांच्याच विजयात मोठा अडसर ठरणार आहे. तरी देखील या मतदारसंघातून पुन्हा पक्षाचे शहरअध्यक्ष व महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटेच आमदारकीचे उमेदवार असतील हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे आमदारकीच्या तयारीसाठी त्यांनी शहर अध्यक्षपदाचा राजीनामा स्विकारावा अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे नऊ पैकी सात नगरसेवक आहेत. तर मतदारांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळेच मागील वेळेस कलाटे राष्ट्रवादीला मागे टाकुन दोन नंबरला राहिले होते. पण सध्यातरी तशी परिस्थिती राहिलेली नाही. बारणे-कलाटे वाद संपला तर शिवसेनेला पुन्हा आपले बस्तान बसवण्यात यश मिळेल. यासाठी येथील नेत्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. तसेच लवकरच दुसर्‍या सक्षम कार्यकर्त्याची वर्णी शहर अध्यक्षपदी लावणे गरजेचे आहे.

राष्ट्रवादीसाठी पुन्हा काटेच योग्य पर्याय ठरु शकतील
राष्ट्रवादीतदेखील तगड्या उमेदवाराची वाणवा आहे. मागीलवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले नाना काटे पुन्हा इच्छुक आहेत, मात्र भाऊसाहेब भोईर यांचा राष्ट्रवादीत झालेला प्रवेश ‘चिंचवडमध्ये उमेदवारी’ या आश्‍वसनावर झाला आहे, असे बोलले जाते. मात्र, महापालिका निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव त्यांना या तिकीटापासून दूर घेऊन जाऊ शकतो. असे असले तरी भोईर किंवा काटे आपला प्रभाव पाडू शकतील असा विश्‍वास त्यांच्या कार्यकर्त्यानाही नाही. पण राष्ट्रवादीमध्ये शिवसेनेपेक्षा स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांची फौज मोठी आहे. त्यांना पुन्हा एकत्रित व पक्षासाठी वाट्टेल ते करण्याची उमेद खुद्द शरद पवार व अजित पवार यांनीच त्यांच्यामध्ये निर्माण केल्यास भाजपा पुढे राष्ट्रवादीचे देखील तगडे आव्हान उभे राहू शकते. जोडीला मित्रपक्ष कॉग्रेसचे देखील आघाडीच्या माध्यमातून सहकार्य मिळणार आहेच यात शंकाच नाही. त्यासाठी राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी आत्तापासूनच तयारीला लागणे गरजेचे आहे. यामध्ये विठ्ठल काटेच योग्य पर्याय ठरु शकतील. कारण जगताप राहत असलेल्या भागातून काटे यावेळी मताधिक्य घेऊ शकतील अशी स्थिती आहे. तसेच मनी पावरचा विचार केल्यास तेही सक्षम असल्यामुळे त्यांचा विचार पुन्हा पक्षाकडून होऊ शकतो.