नाशिकहून जळगावकडे येत असताना आमदार खडसेंची धुळ्याला धावती भेट
धुळे । भाजपत काम करतांना नेते, लोकप्रतिनीधी आणि संघटनात्मक पातळीवर काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते हे पक्षासाठी सारखेच असतात. यामुळे त्यांच्यात भेदाभेद करता येत नाही. धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात कोणी नेतृत्व करावे, हा विषय अजून राज्याच्या पक्षपातळीवर नाही. तो आल्यास प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री बसवून ठरवतील, असे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा करतांना सांगितले की, मी जेव्हा सरकारमध्ये किंवा पक्षात काम करतो. तेव्हा माझ्या जिल्ह्यापुरता विचार न करता धुळे, जळगाव, नंदुरबार म्हणजेच खान्देशच्या सर्वांगिण विकासाचा विचार करतो. मी असे कधीच म्हटले नाही, मला जळगावसाठी निधी द्या, किंवा धुळ्यासाठी निधी द्या. मला खान्देशातील विकासाचा ’बॅकलॉग’ भरुन काढण्यासाठी निधी द्या, अशीच मागणी, मी वेळोवळी मंत्रालयस्तरावर केली आहे. महसूल मंत्री असतांना घोषणा केलेले नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी येथील अप्पर तहसील कार्यालय लवकर स्थापन करावे, यासाठी मी नुकतीच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यासाठी आग्रह धरला आहे. ते कामही लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले. काल रात्री नाशिक येथील एसीबी कार्यालयातून जळगावकडे जातांना माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे धुळे येथे एका हॉटलेवर काही वेळ फ्रेश होण्यासाठी थांबले होते. यावेळी पत्रकारांसोबत बोलतांना त्यांनी अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा केली.
कार्यकर्त्यांच्या गुणवत्तेनुसार जबाबदारी
धुळे जिल्ह्यातील महापलिकेच्या विषयावर बोलतांना त्यांनी सांगितले की, येथील महापालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणी करावे, हा विषय अजून राज्याच्या पक्ष पातळीवर नाही. त्यामुळे त्या विषयी मी जास्त बोलू शकत नाही. परंतू, हा विषय आल्यास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील. तसेच निवडणुकीचा विचार करता किंवा भाजपात काम करतांना नेते, लोकप्रतिनीधी आणि संघटनात्मक जबाबदारी सांभाळणार्या कार्यकर्त्यांमध्ये भेदाभेद होत नाही. पक्षात सर्वच पातळीवरचे पदाधिकारी कार्यकर्ते हे समान असतात. सर्वांना त्यांच्या गुणवत्तेनुसार जबाबदारी सोपविली जाते. धुळ्यातही असेच होईल, अशी शक्यता आहे. यामुळे महापालिका निवडणुकीत यांना किंवा त्यांना डावलले जाणार, या फक्त चर्चा असतात. मी नाशिक येथील अॅन्टी करप्शनच्या कार्यालयात गेलो होतो. तेथे मला त्यांनी चौकशीसाठी बोलविले नव्हते. शिवाय, मुंबई उच्च न्यायालयाकडूनही नाशिक एसीबी कार्यालयास कोणतेही आदेश नव्हते. सन २००५ मध्ये तापी खोरे सिंचन महामंडळात गैरप्रकाराचे काही कथीत आरोप झाले होते. त्याची खुली चौकशी तेव्हा झाली होती. त्या चौकशीत काहीही तथ्य आढळले नव्हते. त्यातील काही माहिती घेण्यासाठी एसीबी कार्यालयात गेलो होतो.
मोलगीत लवकरच तहसील कार्यालय
ग्रामीण भागातील जनतेला विविध महत्वाच्या दाखल्यांसाठी गावातून तालुक्यात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी खेटा माराव्या लागत होत्या. परंतू, महसूल मंत्रीपदावर असतांना तालुकास्तरावर अप्पर तहसील कार्यालय स्थापनेचा निर्णय घेतला आणि धुळे, पिंपळनेर, दोंडाईचा येथे अप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित झाले. आत मोलगी येथील अप्पर तहसील कार्यालय लवकर करावे, यासाठी नुकतीच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यासाठी आग्रह धरला असून तेही लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.
माझ्याविषयी चुकीच्या बातम्या प्रसारित
माहिती अधिकारात ती माहिती मला मिळविण्यासाठी ३० दिवसांचा अवधी लागला असता. त्यामुळे एसीबी कार्यालयात स्वतः गेल्याने ती माहिती मला लवकर मिळाली. माध्यमांची विश्वासार्हता कमी होते, नाशिक एसीबी कार्यालयात माहिती घेण्यासाठी गेलो असता माझ्याविषयी चुकीच्या बातम्या प्रसारीत झाल्यात. माझी कुठलीही चौकशी झाली नसतांना तशा बातम्या माध्यमांनी चालविल्यात. या स्पर्धेच्या युगात ब्रेकींग न्यूजसाठी काही माध्यम अशा प्रकारे पुर्ण माहिती न घेता बातम्या प्रसारीत करतात.
शासनाचे निर्णय जनतेच्या हिताचे
जनतेला निश्चित फायदा होईल नोटबंदी, जीएसटी, बुलेट ट्रेन या विषयांवर कुठलीही घाई झालेली नाही. एखाद्या निर्णयाची अपेक्षीत फलनिष्पत्ती ही काही महिन्यांमध्ये किंवा वर्षात लागलीच मिळत नाही. अशी अपेक्षाही करणे चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेले हे निर्णय दुरगामी परिणाम करणारे आहेत. भविष्यात या निर्णयांचा निश्चितच जनतेला फायदा होईल. त्यामुळे नोटबंदी, जीएसटीसारखे निर्णय हे जनतेच्या हिताचेच आहेत. दरम्यान, सर्वच भागात भाजपची ताकद वाढत असल्याचे आ. खडसेंनी सांगितले.
आमदार गोटे बहुरंगी व्यक्तिमत्व
धुळे जिल्ह्याचा विचार करता आघाडी सरकारच्या काळात धुळे शहरात लक्षात राहील अशी काही कामे झाल्याचे मला तरी आठवत नाही. परंतू, आमदार अनिल गोटे हे आमदार झाल्यानंतर किमान शिवतीर्थ, अब्दुल हमीद चौक, चौकात ठेवेले रणगाड्यांसह अन्य काही लक्षात राहतील, अशी कामे झालेली दिसतात आहेत. आणि आ.गोटे यांची स्वतंत्र विचारसरणी आहे. ते स्व.उत्तमराव पाटील यांचे शिष्य आहेत. ते अतिशय अभ्यासू आणि हुशार लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचा विविध विषयात चांगला अभ्यास आहे. ते बहुरंगी व्यक्तीमत्व आहे. त्यांच्याकडे बरीचशी माहिती असते, असे आमदार एकनाथ खडसे
यांनी सांगितले.