भाजपा आमदार शिवाजी कर्डिलेंची हकालपट्टी करा

0

शिवसेना आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्‍वासन नाही

मुंबई । अहमदनगर येथील नगर महापालिकेच्या केडगाव प्रभागात पोटनिवडणुकीमध्ये वाद झाल्याने शिवसेनेच्या 2 कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या झाली. 2 शिवसैनिकांच्या खून प्रकरणातील आरोपी व सध्या अटकेत असलेले भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची भाजपामधून हकालपट्टी करावी, या शिवसेनेच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही ठोस आश्‍वासन दिले नाही. उलट शिवसेनेच्या मंत्र्यांनाच सबुरीचा सल्ला देत मुख्यमंत्र्यांनी आ. कर्डिले यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली जाणार नसल्याचे संकेत दिले. दरम्यान, रास्ता रोको प्रकरणी शिवसैनिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्‍वासन देत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेलाही चुचकारले आहे. त्यामुळे अहमदनगर खून प्रकरणी आक्रमक झालेल्या शिवसेनेला पुन्हा एकदा आपली तलवार पुन्हा एकदा म्यान करावी लागली आहे.

यामागे भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे संगनमत असल्याचा आरोप करत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतही याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या दुहेरी खून प्रकरणातील आरोपी आमदार शिवाजी कर्डिले यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, शिवसैनिकांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्याची मागणी केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली.