शिंदखेडा । शिंदखेड्यासाठी विकासाचे नवे पर्व सुरु करण्यासाठी सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून अनिल वानखेडे यांच्यावर आपला पूर्ण भरोसा असून, येत्या निवडणुकीत भाजपावर विश्वास दाखवून पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने विजयी करावे, असे आवाहन ना. जयकुमार रावल यांनी केले आहे. बिजासनी मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक माजी पं. स. सदस्य दयाराम देवराम माळी होते. यावेळी पं.स.चे माजी सदस्य सुभाष माळी, नाशिक विभागीय भाजपा प्रभारी लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, अनूप अग्रवाल, युवराज माळी, प्रवीण माळी, पं.स. सदस्या संजीवनी सिसोदे, प्रमिलाताई पाटील, रजनीताई वानखेडे, दिनेश सूर्यवंशी, किरण चौधरी, तालुकाध्यक्ष नथा पाटील, राजेंद्र शिवदास देसले, डॉ. रमेश देसले, प्रकश देसले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकाच पक्षाचे शासन आवश्यक
विभागीय प्रभारी लक्ष्मण सावजी, सुभाष माळी, अरुण देसले यांनी मनोगत व्यक्त केले. ना. रावल यांनी प्रारंभी आमदार आणि त्यानंतर भाजप सत्ता आल्यावर मंत्री म्हणून शिंदखेडा नगरीच्या विकासकामांना दिलेल्या निधीची सविस्तर माहिती दिली. भविष्यात सत्ता आल्यावर शिंदखेडा नगरपंचायत ही राज्यातील सर्वोत्कृष्ट ठरावी, यासाठी प्रयत्न करु, पाणी योजना आगामी सहा महिन्यांत कार्यान्वित होऊन शुद्ध पाणी नागरिकांना मिळेल, बुराई बारमाही करणे, बुराई नदीवरील माळीवाड्यालगत पूल, बुराई चौपाटी करणे, बगीचा तयार करणे, महात्मा फुले भाजीपाला भवन उभारणे, रस्ते, पोट गटारी, सार्वजनिक शौचालये यासाठी गल्ली ते दिल्ली एकाच पक्षाचे शासन असणे अनिवार्य असल्याचे सांगितले. आगामी काळात शिंदखेडा शहरात आश्वासक प्रगतीचे नवे दालन खुले होईल, अशी घोषणा करतानाच पक्षाने दिलेल्या उमेदवारांशी प्रामाणिक रहा, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रदीप दीक्षित यांनी केले.
भविष्यात विकासाचे चित्र
प्रास्ताविकात अनिल वानखेडे यांनी म्हटले की, गावात जाणून-बुजून अफवा पसरविण्यात येत आहेत. त्याचा समाचार घेतला पाहिजे. मतदान हे जाती-धर्मावर आधारीत नाही हे त्यांनी पटवून दिले. शिंदखेडा नगरीसाठी कायमस्वरुपी पाणी योजना मंजूर करावी, मग आम्ही भाजपामध्ये सहभागी होऊ, असे मंत्रीमहोदयांना सांगितल्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांनी केवळ पाचच मिनिटांत पाणी योजना मंजूर केली. यावेळी त्यांचा भाजपा प्रवेश त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी नसून गावाच्या सर्वांगिण विकासासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात सत्ता आल्यावर विकासाचे खरे चित्र आपल्याला दिसेल, असे आश्वासक वक्तव्य त्यांनी केले.