भाजपा कोअर कमिटीची झाली आढावा बैठक

0

मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या दहा महापालिका व २५ जिल्हा परिषदांमध्ये झालेल्या निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची आढावा बैठक शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा, या निवासस्थानी बैठक झाली.

या कोअर कमिटीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री एकनाथ खडसे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आदींचा समावेश आहे. या कमिटीतील सदस्य, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, भाजपाचे पालकमंत्री, जिल्हाध्यक्ष यात सहभागी झाले होते. या बैठकीत पक्षाची पुढील रणनिती ठरवली गेल्याचे समजते.

मुंबई महापालिकेत शिवसेनेबरोबर सत्तेत बसायचे का? महापौरांबाबत काय रणनिती करायची? उल्हासनगरमध्ये सत्तेत सहभागी होण्यासाठी सेनेबरोबर जायचे का? जिल्ह्यात चांगल्या जागा मिळवूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या सांगली, कोल्हापूर, जालना, औरंगाबाद, गडचिरोली, बुलढाणा, जळगावसारख्या जिल्हा परिषदांबाबत काय निर्णय घ्यायचा? सेनेबरोबर युती करायची का? यवतमाळ, नाशिक, हिंगोलीसारख्या जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापनेसाठी सेनेला साथ द्यायची का? आदी विषयांवर यावेळी चर्चा झाल्याचे समजते.