भाजपा कोअर कमेटीचा अजब निर्णय : स्पर्धेत नसलेल्यांना दिली पदे

0

शहराध्यक्ष, तालुकाध्यक्षपद निवडीनंतर भाजपाच्या निष्ठावंतांमध्ये संताप : आज रावसाहेब दानवेंकडे मांडणार गार्‍हाणे

भुसावळ : भुसावळ भाजपा तालुकाध्यक्षपपदाच्या निवडीप्रसंगी माजी मंत्री गिरीश महाजन व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे समर्थक भिडल्याची घटना गत महिन्यात 26 डिसेंबर रोजी कुर्‍हेपानाचे येथे घडली होती तर शहराध्यक्ष पदासाठीदेखील 10 जण इच्छूक असल्याने दोन्ही पदांबाबत कोअर कमेटीकडे निर्णय सोपवण्यात आला होता मात्र गुरुवारी कोअर कमेटीने जे पदासाठी इच्छूक नाहीत त्यांची निवड केल्याने भाजपातील निष्ठावतांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. भुसावळ शहराध्यक्षपदी दिनेश नेमाडे तर तालुकाध्यक्षपदी भालचंद्र पाटील यांची जिल्हा निवडणूक अधिकारी विजय धांडे यांनी नियुक्ती केल्याचेे पत्र जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी यांनी प्रसिद्धीस दिले आहे. दरम्यान, शुक्रवारी जळगावात भाजपा जिल्हाध्यक्षपदाची निवड होत असून त्यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे येण्याची शक्यता असून त्यात हा वाद उफाळण्याची दाट शक्यता आहे.

भाजपामधील घाणेरड्या राजकारणाने निष्ठावंत संतप्त
भुसावळात भाजपा शहराध्यक्ष पदासाठी तब्बल 11 जण इच्छूक असल्याने व कुणाच्याही एकाच्या नावावर एकमत न होवू शकल्याने कोअर कमेटीकडे चेंडू सोपवण्यात आला होता तर तालुकाध्यक्षपद निवडीप्रसंगी माजी मंत्री महाजन व खडसे समर्थक भिडल्यानंतर त्याबाबतही निर्णय कोअर कमेटी घेणार होती मात्र इच्छूकांपैकी कुणाच्या एकाच्या नावाची घोषणा होणे अपेक्षित असताना जे स्पर्धेत नाहीत वा इच्छूक नाहीत त्यांना कोअर कमेटीने पद बहाल केल्याने निष्ठावंतांची पायाची आग मस्तकाला भिडली आहे. पक्षासाठी अनेक वर्ष खस्ता खाल्लेल्या कार्यकर्त्यांना हा निर्णय मान्य नसल्याने शुक्रवारच्या जिल्हाध्यक्ष निवडीप्रसंगी त्यामुळे वादंग उद्भवण्याची दाट शक्यता आहे.

भुसावळात नाराज कार्यकर्त्यांनी घेतली बैठक
भुसावल भाजपा शहराध्यक्ष पदाची निवड बेकायदेशीररीत्या झाल्याने नाराज पदाधिकार्‍यांनी गुरुवारी सायंकाळी अष्टभुजा मंदिराजवळ बैठक घेत दिनेश नेमाडे यांच्या निवडीबाबत आक्षेप नोंदवला. 11 इच्छूकांपैकी तिघांनी माघार घेतल्याने आठ इच्छूकांचे नाव कोअर कमेटीकडे पाठवणे गरजेचे असताना तसे झाले नाही तर पाच केवळ इच्छूकांची नावे पाठवण्यात आली मात्र त्यातूनही निवड झाली नाही. या बैठकीला अ‍ॅड.योगेश बाविस्कर, भिसन गोहर, खुशाल जोशी, अमोल महाजन, नरेंद्र बर्‍हाटे, मंगेश पाटील, श्रीधर दुबे, प्रवीण इखणकर, निलेश रायपुरे, चेतन शर्मा, विशाल सुराणा, शिशिर जावळे, हर्षल जोशी, मदन जोशी, हरीष शर्मा, अनिरुद्ध कुलकर्णी, सुजित भोळे, पुंडलिक पाटील, समीर पाटील, सुरेश कुटे, लक्ष्मणराव सोयंके, यशवंत बेंडाळे, नारायण रणधीर, निलेश अग्रवाल, अमित अग्रवाल आदी उपस्थित होते.

भाजपात गलिच्छ राजकारण -अजय पाटील
वरणगावातील दोघे तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छूक असताना आमचा विचार झाला नाही मात्र अन्य 10 इच्छूकांमधून निवड होणे गरजेचे असताना जे इच्छूक नाही त्यांना पदावर संधी देण्यात आल्याने भाजपात गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा आरोप या पदासाठी इच्छूक असलेले वरणगावातील अजय पाटील यांनी केला. पक्षासाठी 28 वर्षांपासून काम करीत असून आपली नाराजी पक्षावर नाही तर निवड प्रक्रियेवर असल्याचेही ते म्हणाले.