भाजपा खासदार डॉ.हिना गावीत यांचा शक्तीप्रदर्शनानंतर अर्ज दाखल

0

लोकसभा निवडणूक ; काँग्रेस उमेदवार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी साध्या पद्धत्तीने अर्ज भरत फुंकले रणशिंग

नंदुरबार- भारतीय जनता पार्टी युतीच्या उमेदवार डॉ.हिना गावित यांनी शक्तीप्रदर्शन करून तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने पुन्हा खासदार हिना गावित यांना संधी दिली आहे तर काँग्रेसने प्रथमच पारंपरिक उमेदवार बदलून धडगावचे ज्येष्ठ आमदार के.सी.पाडवी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 9 एप्रिल ही शेवटची तारीख आहे.

प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज दाखल
8 एप्रिल रोजीचा मुहूर्त साधत भाजपा व काँग्रेस या प्रतिस्पर्धी दोन्ही उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे. भाजपा-सेना युतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावीत यांच्या उमेदवारीसाठी शहरातून रॅली काढून शक्तिप्रदर्शन दाखविण्यात आले. सजवलेल्या एका वाहनात आमदार डॉक्टर विजयकुमार गावित व सुप्रिया गावित हे विराजमान झाले होते तर खासदार हिना गावीत ह्या आधीच वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी, हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ.रवींद्र चौधरी, डॉ.कांतीलाल टाटीया आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत खासदार डॉक्टर हिना गावीत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित, आमदार सुरुपसिंग नाईक, माजी मंत्री पद्माकर वळवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपाचे आमदार डॉ.विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्र गावित, दीपक भाई पाटील, भूपेशभाई पटेल आदी दिग्गज मंडळी उपस्थित होती. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप व काँग्रेस या दोन्ही मातब्बर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.