भाजपा जळगावात ‘गाढवाचा नांगर’ फिरवणार का?

0

अमित महाबळ: जळगावकरांचे नशीबच फुटके असावे. महापालिकेतील विद्यमान सत्ताधारी भाजपा हा पक्ष जळगाव शहराचे पालकत्व निभावण्यासाठी खरोखर लायक आहे का ? आदिलशहाने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवल्याचा दाखला इतिहासात आहेत. त्यापेक्षा भाजपाने काही वेगळे जळगाव शहराच्या बाबतीत केले आहे का ? असा प्रश्‍न जळगावची आजची स्थिती पाहिल्यानंतर उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ असाच प्रकार कदाचित भाजपाच्या बाबतीत घडत असावा.

भाजपाला जळगाव महापालिकेत काही पहिल्यांदाच सत्ता मिळाली नाही. तत्कालीन नगरपालिकेच्या कार्यकाळातही या पक्षाने सत्तेची फळे चाखली आहेत. तेव्हा लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. त्यानंतर बर्‍याच वर्षांनी 2018 मध्ये भाजपाला महापालिकेत सत्ता मिळाली. जनतेने दोनवेळा संधी दिली मात्र, पक्षाने जळगाव शहराचा असा कोणता ठोस विकास साधला ? हा प्रश्‍न अजूनही अनुत्तरित आहे. आता तर महापालिकेतील एकूण 75 नगरसेवकांमध्ये 57 जण हे भाजपाचे आहेत. विरोधी बाकांवर जेमतेम 18 नगरसेवक आहेत. ‘हम करे सो कायदा’ अशी स्थिती असूनही भाजपाला जळगाव शहराची स्थिती सुधारता आलेली नाही. भाजपाने महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत जी निवडक आश्‍वासने शहरवासियांना दिली होती त्यापैकी कशाकशाची पूर्तता झाली. ‘रात गयी बात गयी’, असा हा प्रकार झाला.

‘सबका साथ, सबका विकास’ हे भाजपाचे धोरण आहे परंतु, अगदी त्याविरूद्ध अर्थातच ‘विकास नव्हे, भकास’ हे धोरण पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी जळगावमध्ये स्वीकारले आहे का ? अमृत पाणीपुरवठा योजना, उड्डाण पूल, कचरा संकलन, एलईडी पथदीप, कचरा प्रक्रिया यापैकी कोणता प्रकल्प महापालिकेतील सत्ताधारी या नात्याने भाजपाने विहीत मुदतीत पूर्ण करून घेतला ? या सर्वातून अर्थ असाच निघतो की, सत्ताधारी बाकांवर बसण्याची भाजपाची लायकी नाही, हा पक्ष शहराचा कारभार हाकूच शकत नाहीत किंवा चुकीच्या लोकांच्या हातात सत्तेची सूत्रे गेली आहेत. याचे उत्तर भाजपाने द्यायला हवे. अंगावर शेकायला लागले म्हणजे कधी मजीप्र, कधी मक्तेदार, तर कधी प्रशासनावरजबाबदारी ढकलून कसे मोकळे होता येईल ? सत्ताधारी म्हणून नियंत्रण ठेवण्याचे काम कोणाचे आहे ? जळगावमधला एक रस्ता धड नाही. दर ठराविक दिवसांनी ठिगळं लावायची कामे होतात, जनता त्रासली आहे. गल्लीबोळात अंधार असतो. वाढीव वस्त्यांमध्ये रात्रीच्या वेळी जाणे दुरापास्त होते. किमान सुविधांची लोकांची अपेक्षा आहे. त्या कसोटीवर भाजपा पुरेपूर खरा उतरला आहे का ? भाजपाची निवडणुकीतील कामगिरी भलेही चमकदार राहिली असेल परंतु, महापालिकेत हा पक्ष सुमारच राहिला आहे. त्यावर उपाययोजना झाली पाहिजे. आधीचेच सत्ताधारी बरे होते असे जळगावकरांनी म्हणू नये.

अन्यथा तो भाजपाचा पराभव असेल.
भाजपाच्या जळगावातील नेत्यांना दोन दाखले आवर्जून द्यावेसे वाटतात. केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना विकासपुरुष म्हटले जाते. त्यांनी शहर विकासाच्या बाबतीत नागपूरचा चेहरा बदलवून दाखवला आहे. त्यांच्यापासून जळगावच्या नेत्यांनी चार गोष्टी शिकून जळगावचे भले करायला हवे अन्यथा दुसरा दाखला इतिहासातील आहे. तो असा की, आजचे पुणे शहर सोळाव्या शतकात पुनवडी नावाने ओळखले जायचे. आदिलशहाने याच पुण्यावर आपल्या सरदारांच्या माध्यमातून गाढवाचा नांगर फिरवला होता. का तर ? आपली जरब बसावी. तोच प्रकार जळगावमध्ये भाजपा करणार आहे का ? याचे उत्तर जळगावकरांना मिळायला हवे.

पालकत्व निभावणार केव्हा ?
सत्ता मिळवली म्हणजे संपले, असे होत नाही. लग्न केलं, मुलं जन्माला घातली पण पालकत्त्व निभवायची तयारी नाही त्यातला हा प्रकार झाला. भाजपाला जळगावची जनता मूर्ख वाटते का ? 22 नोव्हेंबरला शहराचे माजी आमदार सुरेशदादा जैन यांचा वाढदिवस झाला. अनेक दिवसांनी दादांच्या कार्याचा जळगावमध्ये उदोउदो झाला. भाजपावाले चाणाक्ष असतील, तर स्वतःचे भविष्य ओळखतील.

अमित महाबळ, मो. 9890946172